आज ठरेल विजेता...

By admin | Published: August 23, 2015 02:25 AM2015-08-23T02:25:54+5:302015-08-23T02:25:54+5:30

गतवर्षी झालेल्या प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रात थोडक्यात विजेतेपद हुकल्याची खंत असलेला यू मुंबा रविवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदाचे विजेतेपद जिंकायचेच, या निर्धाराने

The winner today will be ... | आज ठरेल विजेता...

आज ठरेल विजेता...

Next

मुंबई : गतवर्षी झालेल्या प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रात थोडक्यात विजेतेपद हुकल्याची खंत असलेला यू मुंबा रविवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदाचे विजेतेपद जिंकायचेच, या निर्धाराने झुंजार बंगळुरु बुल्सविरुद्ध दोन हात करण्यासाठी घरच्या मैदानावर उतरेल. त्याचवेळी याआधी तृतीय क्रमांकासाठी होणाऱ्या सामन्यात तेलगू टायटन्स विरुद्ध पटणा पायरेट्स यांच्यात चुरशीची लढत होईल.
यंदाच्या स्पर्धेत सर्वच संघांनी बचावावर भर देताना सामन्यात बाजी मारण्याचा प्रयत्न केला. यू मुंबानेदेखील काही सामन्यांत सावध भूमिका घेताना गुणतालिकेमध्ये दबदबा राखला. मात्र आक्रमण हीच खरी ताकद असलेला यू मुंबा संघ अंतिम सामन्यात आपल्या लौकिकानुसार बंगळुरु बुल्सला नमविण्यासाठी मैदानात उतरेल.
यू मुंबाचे आक्रमण मजबूत असून कर्णधार अनुपकुमार मुंबईकरांचा हुकमी एक्का आहे. त्याचबरोबर रिशांक देवाडिगा, शब्बीर बापू यांच्यासह प्रदीप कुमार व भूपेंदर सिंगदेखील निर्णायक चढाईसह बंगळुरुला अडचणीत आणण्याची क्षमता राखून आहेत. अनुपने आतापर्यंत या सत्रात संघाकडून सर्वाधिक ६८ यशस्वी चढाई केल्या असून, यानंतर रिशांक (३५) व शब्बीर (२९) यांचा क्रमांक आहे. त्याचवेळी बचावामध्येदेखील यू मुंबाची कामगिरी लक्षवेधी आहे. बचावामध्ये मुंबईकरांची मदार मोहित चिल्लर, सुरेंद्र नाडा, जीवा कुमार आणि विशाल माने यांच्यावर असेल.
मुंबईकडून सर्वाधिक यशस्वी पकडी मोहितने (३८) केल्यानंतर यानंतर सुरेंद्र नाडाने (३७) लक्ष वेधले. त्याचवेळी जीवाने संपूर्ण स्पर्धेत निर्णायक ठरणाऱ्या सुपर टॅकलची कामगिरी तब्बल ७ वेळा केली आहे. थोडक्यात यंदाच्या मोसमामध्ये एकूण १७३ यशस्वी चढाई केलेल्या मुंबईकरांनी बचावामध्ये सर्वाधिक १६६ पकडी केल्या आहेत. शिवाय घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने विजेतेपदाच्या लढाईमध्ये यू मुंबाचे पारडे नक्कीच वरचढ असेल.
दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारलेल्या बंगळुरु बुल्सचा संघदेखील आक्रमण व बचावामध्ये समतोल असल्याने सामना अत्यंत चुरशीचा होईल. अजय ठाकूर बंगळुरुसाठी खोलवर चढाया करीत असून कर्णधार मनजित चिल्लरदेखील दमदार अष्टपैलू खेळ करून बंगळुरुला विजयी मार्गावर आणण्यात मोलाची भूमिका बजावतो. धरमराज चेरालथन आणि सोमवीर शेखर यांच्या दमदार पकडीदेखील मुंबईसाठी अडचणी ठरू शकतात. सांघिक कामगिरीचा विचार केल्यास बंगळुरु संघाने १८१ यशस्वी चढाया करताना १४७ यशस्वी पकडी केल्या आहेत.(क्रीडा प्रतिनिधी)

उपांत्य सामन्यात तेलगू टायटन्स विरुध्द जिंकलो असलो तरी अंतिम क्षणी केलेल्या चुका आम्हाला भोवल्या. एकवेळ आम्ही पराभवाच्या छायेत होतो. यावेळी आमच्या बचावफळीला अतिआत्मविश्वास नडला. मात्र विजयाची खात्री असल्याने आम्ही बाजी मारली. विजेतेपदासाठी यू मुंबाचे कडवे आव्हान असून हा सामना नक्कीच सोप्पा नसणार. दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार असल्याने सामना चुरशीचा होईल.
- मनजीत चिल्लार,
कर्णधार - बंगळुरु बुल्स

पटणा पायरेट्स विरुध्दच्या उपांत्य सामन्यात आम्ही सुरुवातीला आक्रमक खेळ करुन मोठी आघाडी घेण्याची रणनिती आखली होती, जी यशस्वी ठरली. अंतिम सामन्यात देखील हीच रणनिती कायम ठेवून आम्ही मैदानात उतरु. बंगळुरु संघ चांगला असून त्यांना सहजतेने घेण्याची चुक करणार नाही. कर्णधार मनजीत, राजेश मोंडल यांना जास्तीत जास्तवेळ मैदानाबाहेर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करु.
- अनुप कुमार,
कर्णधार, यू मुंबा

Web Title: The winner today will be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.