परिस्थितीनुसार खेळ केल्याने मिळाला विजय - विनेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:03 AM2019-09-20T00:03:30+5:302019-09-20T06:46:11+5:30
प्रशिक्षकाने मला वेगळेच डावपेच सुचविले होते. मॅटवर मी पुढे आलेल्या आव्हानांसाठी वेगळेच डावपेच अंमलात आणले होते, असे विनेशने सांगितले.
नीर सुल्तान (कझाखस्तान) : कुस्तीत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करणारी पहिली भारतीय मल्ल होण्याचा मान मिळविणाऱ्या विनेश फोगाटने ऑलिम्पिक पात्रतेच्या महत्त्वपूर्ण लढतीत मॅटवर परिस्थितीनुरुप खेळ केल्यानेच विजय मिळाल्याचे म्हटले.
विश्व चॅम्पियनशिपच्या ऑलिम्पिक पात्रता कुस्तीआधी प्रशिक्षक वूलर एकोस यांनी विनेशला सारा एन हिल्टरब्रॅन्ड हिच्यापासून दूर राहण्याचा तसेच तिचा उजवा हात रोखणे आणि पाय पकडू न देण्याचा कानमंत्र दिला होता. विनेशने सामन्यातील परिस्थिती ओळखून याउलट केले. ५३ किलो गटात कांस्य जिंकण्यासह ऑलिम्पिक कोटा निश्चित केल्यानंतर दिलेल्या मुलखातीत सांगितले की प्रशिक्षकाने मला वेगळेच डावपेच सुचविले होते. मॅटवर मी पुढे आलेल्या आव्हानांसाठी वेगळेच डावपेच अंमलात आणले होते.
डावपेच अलगद लागू पडल्याचे सांगताना विनेश म्हणाली,‘ मी स्वत:वर दडपण आणत आहे, असा अनेकांचा समज झाला असावा. मी गुण गमवित नसल्याने प्रतिस्पर्धी खेळाडू थकताना जाणवली. पाय तावडीत देण्याच्या निमित्ताने मी खंबीर बचाव केला.माझ्या तुलनेत सारा बलाढ्य होती. तिने ताकद पणाला लावल्याचा लाभ घेत मी बाजी मारली.’
आई असती तर...
मोठे पदक जिंकण्याचे महत्त्व काय असते, याची विनेशला जाणीव आहे. रिओ आॅलिम्पिक आधी झालेली दुखापत ती विसरु शकलेली नाही. यामुळे काही आठवडे व्हीलचेअरवर घालवावे लागले. माझ्या आईने माझी कुस्ती पाहणे बंद केले होते. मी पुन्हा जखमी होऊ शकते अशी तिला भीती वाटायची. तिने ही कुस्ती पाहिली असती, तर ओरडून ओरडून इतरांचे लक्ष वेधले असते. माझ्या मुलीचा पाय तोडू नका, अशी विनवणी केली असती.’ मल्ल असलेला पती सोमवीर राठी याच्याबाबत विनेश म्हणाली,‘ सोमवीरने भलेही पदके जिंकली नाहीत, पण कुस्तीतील डावपेचांमध्ये ते चाणाक्ष आहेत. विदेशी प्रशिक्षकासारख्या टीप्स त्यांच्याकडूनही मी घेत असते.’