इंडिया रेड संघाचा दणदणीत विजय

By admin | Published: August 27, 2016 06:31 AM2016-08-27T06:31:27+5:302016-08-27T06:31:27+5:30

इंडिया रेड संघाने गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र दुलीप चषक प्रथम श्रेणी सामन्यात इंडिया ग्रीनला २१९ धावांनी लोळवले.

The winning sound of India Red team | इंडिया रेड संघाचा दणदणीत विजय

इंडिया रेड संघाचा दणदणीत विजय

Next


ग्रेटर नोएडा : चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या (६/८८) शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंडिया रेड संघाने गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र दुलीप चषक प्रथम श्रेणी सामन्यात इंडिया ग्रीनला २१९ धावांनी लोळवले.
सामन्यात पूर्णपणे वर्चस्व राखलेल्या इंडिया रेडने इंडिया ग्रीनचा पराभव कधीच निश्चित केला होता. मात्र, कर्णधार सुरेश रैनाने झुंजार फलंदाजी करताना संघाचा पराभव काहीवेळ लांबवला. ४९७ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी ग्रीन संघाने ७ बाद २१७ धावा अशी सुरुवात केली होती. मात्र, यानंतर फारवेळ त्यांचा डाव चालला नाही आणि ५६.२ षटकात २७७ धावांत ग्रीन संघाला गुंडाळून रेडने बाजी मारली.
रैनाने चौथ्या दिवशी वैयक्तिक ४२ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. तो ९० धावा काढून बाद झाला. विशेष म्हणजे देशांतर्गत सामन्यात उत्तर प्रदेशकडून खेळताना आपलाच संघ सहकारी असलेल्या कुलदीपविरुद्ध रैना वरचढ ठरत होता. मात्र, ९० धावांवर असताना झटपट शतक झळकावण्याच्या प्रयत्नात तो परतला. १०१ चेंडूंचा सामना करताना त्याने ११ चौकार व ३ षट्कारांसह आपली खेळी सजवली.
इंडिया रेडने पहिल्या डावात अभिनव मुकुंदच्या (७७) जोरावर १६१ धावा उभारल्यानंतर ग्रीन संघाला १५१ धावांत बाद केले होते, तर दुसऱ्या डावात मुकुंद (१६९) आणि सुदीप चॅटर्जीच्या (११४) जोरावर ४८६ धावांचा डोंगर रचून ग्रीन संघापुढे ४९७ धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे केले होते. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक :
इंडिया रेड (पहिला डाव) : ४८.२ षटकात सर्वबाद १६१ धावा (अभिनव मुकुंद ७७, अनुरीत सिंग ३२; संदीप शर्मा ४/६२. प्रग्यान ओझा ३/१९)
इंडिया ग्रीन (पहिला डाव) : ४५.४ षटकात सर्वबाद १५१ धावा. (सौरभ तिवारी ५०, सुरेश रैना ३५; नथू सिंग ६/५३, कुलदीप यादव ३/३२)
इंडिया रेड (दुसरा डाव) : ११६.५ षटकात सर्वबाद ४८६ धावा (मुकुंद १६९, सुदीप चॅटर्जी ११४; श्रेयश गोपाळ ५/१२३)
इंडिया ग्रीन (दुसरा डाव) : ५६.२ षटकात सर्वबाद २७७ धावा (सुरेश रैना ९०, रॉबिन उथप्पा ७२; कुलदीप यादव ६/८८)

Web Title: The winning sound of India Red team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.