कोलकाताचा दणदणीत विजय
By admin | Published: April 14, 2017 12:49 AM2017-04-14T00:49:27+5:302017-04-14T00:49:27+5:30
उमेश यादवची शानदार गोलंदाजी व कर्णधार गौतम गंभीरच्या नाबाद आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने
कोलकाता : उमेश यादवची शानदार गोलंदाजी व कर्णधार गौतम गंभीरच्या नाबाद आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. यासह पंजाबचे सलग तिसऱ्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवताना कोलकाताने ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली.
पंजाबने दिलेल्या १७१ धावांचे आव्हान कोलकाताने २ फलंदाजांच्या मोबदल्यात २१ चेंडू राखून पार केले. गंभीरने यावेळी एकप्रकारचा जुगार खेळताना सुनिल नरेनला सलामीला पाठवले. या आश्चर्यकारक निर्णयाचा कोलकाताला फायदा झाला. सुरुवातीला काही फटके खेळताना अडखळल्यानंतर नरेनने १८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकार ठोकत ३७ धावांचा तडाखा दिला. तसेच, गंभीरने संघाच्या विजयावर शिक्का मारताना ४९ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७२ धावा काढल्या. या दोघांनी ३४ चेंडूत ७६ धावांची तुफानी सलामी देत कोलकाताचा विजय निश्चित केला होता. रॉबिन उथप्पा (२६) आणि मनिष पांड्ये (२५*) यांनीही मोलाचे योगदान दिले. तत्पूर्वी, आक्रमक सुरुवात केलेल्या पंजाबने २० षटकात ९ बाद १७० धावांची आव्हानात्मक मजल मारली. उमेश यादवने मोक्याच्यावेळी पंजाबची मधली फळी कापताना ३३ धावांत ४ बळी घेतले. हाशिम आमला (२५) आणि मनन वोहरा (२८) यांनी पंजाबला ३१ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी सलामी दिली. मात्र, यानंतर त्यांचा डाव घसरला. कर्णधार मॅक्सवेल (२५), डेव्हिड मिल्लर (२८) आणि वृध्दिमान साहा (२५) यांनी पंजाबच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, उमेशच्या माऱ्यापुढे त्यांचा डाव मर्यादेत राहिला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ९ बाद १७० धावा (मनन वोहरा २८, डेव्हिड मिल्लर २८, वृध्दिमान साहा २५, ग्लेन मॅक्सवेल २५, हाशिम आमला २५; उमेश यादव ४/३३, ख्रिस वोक्स २/३०) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १६.३ षटकात २ बाद १७१ धावा (गौतम गंभीर नाबाद ७२, सुनिल नरेन ३७, रॉबिन उथप्पा २६, मनिष पांड्ये नाबाद २५; वरुण अॅरोन १/२३, अक्षर पटेल १/३६)