विजयाचा दिलासा

By admin | Published: January 24, 2016 02:26 AM2016-01-24T02:26:06+5:302016-01-24T02:26:06+5:30

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या शानदार सलामीनंतर मनीष पांडेच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियात पराभवाची शृंखला खंडित करून पाचव्या

WINNING SUPPORT | विजयाचा दिलासा

विजयाचा दिलासा

Next

सिडनी : रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या शानदार सलामीनंतर मनीष पांडेच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियात पराभवाची शृंखला खंडित करून पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शनिवारी सहा गड्यांनी विजय नोंदविला. भारताच्या विजयामुळे यजमान संघाचे क्लीन स्वीपचे स्वप्नदेखील भंगले.
आॅस्ट्रेलियाने ओळीने चार विजय नोंदवीत मालिका आधीच खिशात घातली होती. त्यांचा इरादा क्लीन स्वीप करण्याचा होता, तर भारताला प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान होते. मालिकेचा निकाल ४-१ असा आॅस्ट्रेलियाच्या बाजूने राहिला. धोनीने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला फलंदाजी दिली. आॅस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी ४ बाद ११७ असे रोखलेदेखील, पण डेव्हिड वॉर्नरने ११३ चेंडूंत १२२ धावा ठोकल्या. त्याने मिशेल मार्शसोबत (८४ चेंडूंत नाबाद १०२ धावा) पाचव्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी केली. यामुळे आॅस्ट्रेलियाने ७ बाद ३३० धावा उभारल्या.
शिखर धवन (५६ चेंडूंत ७८), तसेच रोहित शर्माने (१०६ चेंडूंत ९९ धावा) १८.२ षटकांत १२३ धावांची भर घालून झकास सुरुवात केली. पांडेने विजयी कळस चढविला. त्याने विपरीत स्थितीत ८१ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह नाबाद १०४ धावांचे योगदान दिले. त्याने धोनीसोबत (४२ चेंडूंत ३४ धावा) चौथ्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली. भारताने ४९.४ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ३३१ धावा करीत सामना जिंकला. या विजयामुळे २६ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टी-२० मालिकेसाठी संघात उत्साह संचारण्यास मदत मिळेल.
रोहित-धवन यांनी गोलंदाजांच्या उणिवा शोधून हल्लाबोल केला. हेस्टिंग्ज आणि मार्श यांच्या चेंडूंवर दोघांनीही मोठे फटके मारले. हेस्टिंग्जने धवनला बाद करीत ही जोडी फोडली. हेस्टिंग्जने पुढच्या षटकांत विराट कोहली(८)याला यष्टीमागे झेलबाद करीत मोठा अडथळा दूर केला. मनीष पांडेवर मोठी जबाबदारी होती. ती त्याने पेलली.
रोहितसोबत त्याने वेगाने धावा खेचल्या. दरम्यान, रोहितने २८ वे अर्धशतक पूर्ण केले, शिवाय पाच हजार धावांचा पल्ला गाठला. त्याला एकदा जीवदान मिळाल्याने तो शतक झळकवेल, असे वाटत होते; पण हेस्टिंगने त्यालादेखील जाळ्यात ओढले. भारताला अखेरच्या षटकांत १३ धावांची गरज होती. मिशेल मार्शच्या पहिला चेंडू वाईड टाकला. धोनीने पुढच्या चेंडूवर षटकार खेचला. त्याच्या पुढच्या चेंडूवर धोनी स्वत: झेलबाद झाला.
पांडेने मात्र थर्डमॅनवर शानदार चौकार ठोकून स्वत:चे पहिले शतक पूर्ण केले आणि पुढच्या चेंडूवर दोन धावा घेत संघाचा विजय साकार केला. त्याआधी वॉर्नर आणि शॉन मार्श यांची शतके आॅस्ट्रेलियाच्या डावाचे आकर्षण ठरले. वॉर्नरने नऊ चौकार आणि तीन षटकारांसह १२२, तसेच शॉन मार्शने नऊ चौकार व दोन षटकारांसह १०२ धावा ठोकल्या. (वृत्तसंस्था)

विजयामुळे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल : धोनी
आॅस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वन-डे लढतीतील विजययामुळे सुटकेचा श्वास सोडणारा भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या मालिकेत भारतीय संघाने कडवी टक्कर दिली असल्याचे म्हटले आहे. आजच्या विजयामुळे टी-२० मालिकेसाठी संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, असेही तो म्हणाला.
आॅस्ट्रेलियाला क्लीन स्वीपपासून रोखण्यात यशस्वी ठरल्यानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘‘या मालिकेत आम्ही कडवी लढत दिली. आमचे लक्ष्य केवळ विजय मिळवण्याचे होते. सुरुवातीच्या चारही सामन्यांत आम्ही विजयासमीप होतो, पण विजयाला गवसणी घालता आली नाही. वन-डे क्रिकेटमध्ये विजय सर्वांत महत्त्वाचा असतो.’’
धोनी म्हणाला, ‘‘विशाल धावसंख्येच्या लढतीत प्रत्येक षटक महत्त्वाचे असते. ज्या षटकात १५ ते २० धावा पटकावल्या गेल्या त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मदत झाली. आमच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण तळाच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. पण, आज मधल्या फळीत मनीष पांडेने चमकदार कामगिरी करीत संघाला विजय मिळवून दिला.’’
भारताने मालिका १-४ ने गमावली, पण मानांकनामध्ये दुसरे स्थान कायम राखण्यासाठी अखेरच्या लढतीत महत्त्वाचा विजय मिळवला.
धोनी म्हणाला, ‘‘मनीषने चांगली फलंदाजी केली, पण आम्हाला गोलंदाजी विभागामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कारण आमच्या संघात निश्चित असा वेगवान मारा नाही. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.’’ धोनी म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियातील मैदाने विशाल आहेत. तुमचे क्षेत्ररक्षक आक्रमक नसतील किंवा दर्जेदार नसतील तर दडपण येते.’’
——————

(वृत्तसंस्था)

यशस्वी पाठलाग केला : स्मिथ
विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने प्रशंसा केली.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना स्मिथ म्हणाला, ‘‘३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसते, पण भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. आम्ही चांगली फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली, भारतीय फलंदाजांनी सकारात्मक पवित्रा राखत विजय मिळवला.’’
‘‘आमच्या खेळाडूंनी या मालिकेत शानदार खेळ केला. भारतीय संघाने संघर्षपूर्ण खेळ केला, पण मोक्याच्या क्षणी आम्ही खेळाचा दर्जा उंचावत मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो.’’

धावफलक
आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच पायचीत गो. ईशांत ६, डेव्हिड वॉर्नर झे. जडेजा गो. ईशांत १२२, स्टीव्हन स्मिथ झे. रोहित गो. बुमराह २८, जॉर्ज बेली झे. ईशांत गो. रिषी धवन ६, शॉन मार्श धावबाद ७, मिशेल मार्श नाबाद १०२, मॅथ्यू वेड झे. धोनी गो. यादव ३६, जेम्स फॉल्कनर त्रि. गो. बुमराह १, जॉन हेस्टिंग्ज नाबाद २, अवांतर : २०, एकूण : ५० षटकांत ७ बाद ३३० धावा. गडी बाद क्रम : १२/६, २/६४, ३/७८, ४/११७, ५/२३५, ६/३२०, ७/३२३. गोलंदाजी : ईशांत १०-०-६०-२, उमेश यादव ८-०-८२-१, बुमराह १०-०-४०-२, रिषी धवन १०-०-७४-१, जडेजा १०-०-४६-०, गुरकिरत २-०-१७-०.
भारत : रोहित शर्मा झे. वेड गो. हेस्टिंग्ज ९९, शिखर धवन झे. शॉन मार्श गो. हेस्टिंग्ज ७८, विराट कोहली झे. वेड गो. हेस्टिंग्ज ८, मनीष पांडे नाबाद १०४, महेंद्रसिंह धोनी झे. वॉर्नर गो. मिशेल मार्श ३४, गुरकिरत मान नाबाद ००, अवांतर : ८, एकूण : ४९.४ षटकांत ४ बाद ३३१ धावा. गडी बाद क्रम : १/१२३, २/१३४, ३/२३१, ४/३२५. गोलंदाजी : हेस्टिंग्ज १०-१-६१-३, बोलॅन्ड १०-०-५८-०, मिशेल मार्श ९.४-०-७७-१, फॉल्कनर १०-०-५४-०, लियॉन ८-०-५८-०, स्मिथ २-०-२०-०.

Web Title: WINNING SUPPORT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.