पेसची माघार हा मोठा मुद्दा नव्हता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:18 AM2018-12-05T04:18:23+5:302018-12-05T04:18:30+5:30
आशियाई स्पर्धेच्या पुरुष दुहेरी स्पर्धेपूर्वी लिएंडर पेसने अचानक माघार घेतली होती. मात्र भारताचा डेव्हिस चषकाचा कर्णधार महेश भूपतीच्या मते ही मोठी बाब नव्हती.
नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेच्या पुरुष दुहेरी स्पर्धेपूर्वी लिएंडर पेसने अचानक माघार घेतली होती. मात्र भारताचा डेव्हिस चषकाचा कर्णधार महेश भूपतीच्या मते ही मोठी बाब नव्हती.
तो म्हणाला, ‘दुखापत ही खेळाडूच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दुखापतीसह मैदानात उतरून त्यानंतर मैदानाबाहेर येण्यापेक्षा सामन्यापूर्वीच माघार घेणे कधीही चांगले असे मला वाटते.’ आशियाई स्पर्धेपूर्वी पेस अमेरिकेतील स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने आशियाई स्पर्धेतून आपण माघार घेत असल्याचे कळवले होते.
पेसच्या माघारीमुळे आशियाई स्पर्धेतील आपल्या अभियानाला काही फरक पडला नसल्याचे स्पष्ट करीत भूपतीने पुरुष दुहेरीत भारताने सुवर्णपदक जिंकल्याचेही सांगितले. तो म्हणाला, ‘आशियाई स्पर्धेपूर्वी एका स्पर्धेत खेळताना पेसला दुखापत झाली आहे. इतकीच माहिती मला मिळाली होती. आमचे ध्येय सुवर्णपदक जिंकण्याचे होते आणि ते आम्ही साध्य केले.’
तो म्हणाला, ‘कोणताही खेळाडू सामन्यादरम्यान दुखापतीमुळे बाहेर पडला तर मला आवडणार नाही. त्यापेक्षा दुखापतग्रस्त खेळाडूने सामन्यापूर्वीच माघार घेतलेली कधीही चांगली.’ या स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिविज शरण या जोडीने अंतिम सामन्यात अलेक्झांडर बुबलिक व डेनिस युवसेयेव या जोडीला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले होते.
खेळाडूंच्या दुखापतीबाबत तो म्हणाला, ‘मी पाच डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान किमान दहा खेळाडू दुखापतग्रस्त झाले. युकी भांबरीने एक सामना खेळला. सुमित नागल सामन्यातून बाहेर पडला. एक खेळाडू असल्याने दुखापत ही खेळाडूच्या आयुष्याचा भाग असल्याचे मला माहीत आहे. डेव्हिस चषकाच्या बदलत्या स्वरुपात भारताला आता फेबु्रवारीत इटलीविरुद्ध लढावे लागणार आहे. भारताला या सामन्यात जिंकण्याची संधी असल्याचे भूपतीने सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही आमच्या देशातच खेळणार असल्याचा आम्हाला फायदा होणार आहे.’