कष्टाशिवाय पदक नाहीच - मनु भाकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:51 AM2018-05-10T00:51:46+5:302018-05-10T00:51:46+5:30
अवघ्या १६ वर्षांच्या वयात देशाला राष्ट्रकुल आणि विश्व चषकात सुवर्ण मिळवून देणाऱ्या नेमबाजीत मनु भाकर हिचा यंदाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. मात्र, यामुळे ती व्यथित मुळीच नाही. अनुभव अधिक मोठा करण्यासाठी ती ज्युनियर आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतही भाग घेत आहे.
नवी दिल्ली : अवघ्या १६ वर्षांच्या वयात देशाला राष्ट्रकुल आणि विश्व चषकात सुवर्ण मिळवून देणाऱ्या नेमबाजीत मनु भाकर हिचा यंदाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. मात्र, यामुळे ती व्यथित मुळीच नाही. अनुभव अधिक मोठा करण्यासाठी ती ज्युनियर आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतही भाग घेत आहे. आशियाई स्पर्धेची भीती तिच्या मनात नाही. ती म्हणते, आव्हान हे पेलण्यासाठीच असते. त्या आव्हानाचा सामना करावाच लागेल. कष्टाशिवाय पदक मिळत नाही.
मनु भाकर हिने नुकताच राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत नव्या विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. आपल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत मनुने शानदार प्रदर्शन करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपल्या कामगिरीवर तिला पूर्ण विश्वास आहे. ती म्हणते, आशियाई क्रीडा स्पर्धेत मजबूत दावेदार असतात. मात्र, मी प्रत्येक स्पर्धा सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करते. मी माझी ट्रेनिंग सुरू केली आहे. आशा करते की देशाला गौरव मिळवून परंपरा कायम ठेवेन.
मनुचे वडील रामकिशन यांना मनुवर मानसिक दबाव असतो काय, हे विचारले असता ते म्हणाले की, ‘ती कोणत्याही लक्ष्याचा विचार
मनात ठेवत सहभागी होत नाही. ती केवळ आपल्या निशाण्यावर लक्ष केंद्रित करते. ज्यामुळे तिच्यावर दबाव पडत नाही. हार-जीत हा खेळाचा एक भाग आहे, हे तिला चांगले माहीत आहे.’ (वृत्तसंस्था)
मनुच्या बारावीचा अभ्यास आई घेणार
मनु सध्या १२ ला आहे. या वर्षी काही दिवसच ती भारतात राहणार आहे. त्यामुळे अभ्यास कशी करणार? असे विचारले असता तिची आई सुमेधा म्हणाल्या की, दहावीच्या परीक्षेवेळी जानेवारी आणि फेब्रुवारीत मी तिला शिकवले होते. ती चांगल्या मार्क्सनी पास झाली होती. १२ वीची परीक्षाही आता ती अशीच देईल.