सोनू सूदनं जिला स्पर्धेसाठी खरेदी करून दिली रायफल, त्या महिला नेमबाज कोनिका लायकनं केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:15 PM2021-12-16T12:15:35+5:302021-12-16T12:16:28+5:30
दिग्गज नेमबाज जॉयदीप कर्माकर याच्या कोलकाता येथील अकादमीत कोनिका सराव करत होती. माहितीनुसार ती मागील ३-४ दिवसांपासून अकादमीतही गेली नव्हती
भारताची उदनोन्मुख नेमबाज कोनिका लायक ( konica layak ) हिच्या आत्महत्येचे वृत्त समोर येत आहे. झारखंडच्या धनबाद शहरातील कोनिका कोलकाता येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. तिनं कोलकाता येथील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त TV9 हिंदीनं दिलं आहे. मागील चार महिन्यांत आत्महत्या करणारी कोनिका ही चौथी नेमबाज आहे. मागील काही दिवसांपूर्वी पंजाबची १७ वर्षीय नेमबाज खुश सीरत कौर हिनंही आत्महत्या केली होती. तिनं पिस्तुलानं स्वतःला गोळी मारून घेतली होती. खुश सीरत हिनं कनिष्ठ वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी ऑक्टोबरमध्ये पंजाबची हुनरदीप सिंह सोहल आणि सप्टेंबरमध्ये मोहालीची नमनवीर सिंग बराड यांनी आत्महत्या केली.
कोनिका लायक ही तिच नेमबाजपटू आहे जिला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं रायफल खरेदी करण्यात मदत केली होती. तिनं जानेवारी महिन्यात ट्विट करून सोनू सूदकडे मदत मागितली होती. ''११व्या झारखंड राज्य रायफल नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत मी रौप्यपदक जिंकले. तरीही सरकारकडून मला काहीच मदत मिळत नाही. मला एक रायफल घेऊन देऊन मदत करा,''असे कोनिकाने आवाहन केले होते. राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन वेळा पात्र ठरलेल्या या नेमबाजला प्रशिक्षक किंवा मित्रमेत्रीणींकडून रायफल मागावी लागायची. तिच्या ट्विटला सोनू सूदनं मार्चमध्ये उत्तर दिले आणि लवकरच तिला रायफल मिळेल, असे आश्वासन दिले होते आणि ते त्यानं पूर्णही केलं.
@sonusood सर मेरी बंदूक़ आ गई।मेरे परिवार में ख़ुशी की लहर फैल गई है और पूरा गाँव आपको आशीर्वाद दे रहा है। जुग जुग जीयो @sonusood सर🙏 thank you @Govindagarwal_ bhai pic.twitter.com/TDk14WZeG3
— Konica Layak (@konica_layak) June 26, 2021
दिग्गज नेमबाज जॉयदीप कर्माकर याच्या कोलकाता येथील अकादमीत कोनिका सराव करत होती. माहितीनुसार ती मागील ३-४ दिवसांपासून अकादमीतही गेली नव्हती. तिनं २०१६ व २०१७ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेची पात्रता मिळवली होती, परंतु तिला पदक जिंकता आले नव्हते.