महिला खेळाडूंना अजूनही कमी लेखले जाते : कीरथ, सुनीतीचा आरोप
By admin | Published: July 14, 2017 01:03 AM2017-07-14T01:03:47+5:302017-07-14T01:03:47+5:30
कीरथ भंडाल आणि सुनीती दमानी ही दोन नावे बिलियर्ड्स आणि स्नूकरच्या विश्वात कमी परिचयाची आहेत
नवी दिल्ली : कीरथ भंडाल आणि सुनीती दमानी ही दोन नावे बिलियर्ड्स आणि स्नूकरच्या विश्वात कमी परिचयाची आहेत. परंतु त्यांच्या महिलांना मिळणाऱ्या कमी रकमेच्या पुरस्कारावरून केलेल्या आरोपाने अनेक वर्षांपासून सुरूअसलेल्या चर्चेला पुन्हा जन्म दिला आहे. अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करून आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवूनही त्यांना पुरुषांच्या तुलनेत पाचपट कमी रक्कम मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
२00७ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणाऱ्या कीरथ यांनी सांगितले की, देशासाठी इतकी वर्षे खेळूनही आम्हाला आपला खर्च स्वत:च करावा लागत आहे. यंदा मी राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली होती, आणि मला फक्त पाच हजार रुपये मिळाले होते. हे सांगतानाही मला संकोच वाटत आहे. दिल्लीची रहिवाशी असलेल्या कीरथ यांनी बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. देशातील अव्वल स्नूकर खेळाडू असलेल्या सुनीती दमानी यांनी २0१२ मध्ये राष्ट्रीय किताब जिंकला होता. याशिवाय त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सुनीती यांना ज्युनिअर गटातील किताब जिंकल्यानंतर अतिशय कमी रक्कम मिळाली होती. गेल्या वर्षी सिनिअर बिलियर्ड्स स्पर्धा जिंंकल्यानंतर त्यांना फक्त दहा हजार रुपये मिळाले होेते. पण याच स्पर्धेत पुरुष गटातील विजेत्याला ५0 हजार रुपये बक्षीस मिळाले होते.
सुनीती म्हणाल्या की, आम्ही आतापर्यंत बक्षिसाच्या रकमेला व्यवहारापेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक महत्त्व देत आलो आहोत. पण एकाच स्पर्धेत महिलांना पुरुषांपेक्षा पाचपट कमी रक्कम मिळते हे वास्तव पचवणे जड जात आहे.
नोकरी असो, वा बक्षिसाची रक्कम सर्वत्र महिलांना कमी दर्जा दिला जात असल्याचेही सुनीती यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)