महिला क्रिकेट विश्वचषक : भारताचा विजयी ‘चौकार’
By admin | Published: July 5, 2017 10:45 PM2017-07-05T22:45:12+5:302017-07-05T23:16:20+5:30
सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने चौथ्या लढतीत सुद्धा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
धावांचा पाठलाग करताना लंकेने सावध सुरुवात केली. दिलानी मनोदरा (६१), शशिकला सिरिवर्देने (३७) आणि निपुनी हंसिका (२९) यांच्या जोरावर श्रीलंकेने आपले आव्हान कायम राखले होते. परंतु, अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी २ बळी घेत लंकेची कोंडी केली. दीप्ती आणि एकता बिस्त यांनीही प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला.
कांऊटी मैदानावर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्विकारली. परंतु, पूनम राऊत (१६) आणि स्मृती मानधना (८) या फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीरांना झटपट बाद करुन श्रीलंकेने भारताचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर राज - शर्मा या जोडीने ११८ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन भारताला सावरले. ही जोडी भारताला मोठी मजल मारुन देणार अशी अपेक्षा असताना अमा कांचना हिने शर्माला बाद करुन ही जोडी फोडली.
यानंतर भारतीयांनी आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात विकेट फेकल्याने धावसंख्या मर्यादित राहिली. शर्मा परतल्यानंतर झूलन गोस्वामी (९) व मिताली पाठोपाठ परतल्याने भारतीय फलंदाजी
काहीशी दडपणाखाली आली. हरमनप्रीत कौर (२०) आणि वेदा कृष्णमुर्ती (२९) यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पलीकडे मजल मारण्यात यश आले. श्रीलंकेच्या श्रीपाल वीराकोडीने ३ आणि इनोका रणवीराने २ बळी घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
भारत : ५० षटकात ८ बाद २३२ धावा (दीप्ती शर्मा ७८, मिताली राज ५३, वेदा कृष्णमुर्ती २९; श्रीपाल वीराकोडी ३/२८, इनोका रणवीरा २/५५).
श्रीलंका : ५० षटकात ७ बाद २१६ धावा (दिलानी मनोदरा ६१, शशिकला सिरिवर्दने ३७, निपुनी हंसिका २९; पुनम यादव २/२३, झुलन गोस्वामी २/२६, दीप्ती शर्मा १/४६.)