ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चौरंगी मालिकेसाठी महिला हॉकी संघाची निवड
By admin | Published: May 23, 2016 08:46 PM2016-05-23T20:46:17+5:302016-05-23T20:46:17+5:30
३० मे पासून सुरु होणाऱ्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी डिफेंडर सुशीला चानू हिच्याकडे भारतीय महिला संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.
सुशीला चानूकडे भारताचे नेतृत्व
नवी दिल्ली : आॅस्टे्रलियातील डार्विन येथे ३० मे पासून सुरु होणाऱ्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी डिफेंडर सुशीला चानू हिच्याकडे भारतीय महिला संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. रिओ आॅलिम्पिकची पुर्व तयारी म्हणून पाहण्यात येत असलेल्या या चौरंगी स्पर्धेत यजमान व जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या आॅस्टे्रलिया, चौथ्या क्रमांकाच्या न्यूझीलंड आणि दहाव्या क्रमांकावरील जपानचा सहभाग आहे.
या स्पर्धेसाठी संघाची नियमित कर्णधार रितू रानीला विश्रांती देण्यात आली आल्याने कर्णधारपदासाठी सुशीलाला संधी मिळाली. त्याचवेळी दीपिकाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय संघात पूनम रानी आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंचा समावेश असून डिफेंडर निक्की प्रधान आणि १८ वर्षीय मिडफिल्डर प्रीती दुबे यांसारख्या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
आपल्या नव्या भूमिकेबाबत सुशीलाने सांगितले की, ‘‘संघाच्या कर्णधारपदी निवड होणे ही अत्यंत सम्मानाची बाब आहे. आम्ही हाक बे चषक स्पर्धेत न्यूझीलंड व जपानचा सामना केला आहे. जपान व आॅस्टे्रलियाविरुध्द चांगली कामगिरी करण्याचे आमचे मुख्य लक्ष्य असून त्यांच्या खेळाला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आॅलिम्पिकमध्ये हे दोन्ही संघ भारताच्याच गटात असल्याने ही आमच्यासाठी एक चांगली संधी आहे.’’ (वृत्तसंस्था)
........................................
भारतीय महिला हॉकी संघ :
गोलरक्षक : सविता, रजनी इतिमारपू. बचावफळी : दीपिका (उपकर्णधार), सुनीता लाकडा, निक्की प्रधान, सुशीला चानू (कर्णधार), हनियालुम लाल राउत फेली. मध्यरक्षक : रानी, नमिता टोप्पो, नवजोत कौर, मोनिका, प्रिती दुबे, रेणुका यादव. आक्रमक फळी : पूनम रानी, वंदना कटारिया, अनुराधा देवी थोकचोमा आणि लिलिमा मिंज.