महिला राष्ट्रीय कबड्डी : भारतीय रेल्वेला अजिंक्यपद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 09:24 PM2019-07-14T21:24:54+5:302019-07-14T21:26:00+5:30

रेल्वेने या वर्षात दुहेरी मुकुट मिळवला आहे.

Women's National Kabaddi: Indian railway win title | महिला राष्ट्रीय कबड्डी : भारतीय रेल्वेला अजिंक्यपद

महिला राष्ट्रीय कबड्डी : भारतीय रेल्वेला अजिंक्यपद

googlenewsNext

मुंबई : भारतीय रेल्वेने "६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत हरियाणाचा धुव्वा उडवीत गतवर्षी पटरीवरून घसरलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणली. पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे आज झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने हरीयाणाला ४८-२३असे धुवून काढत पुन्हा एकदा दणक्यात विजयोत्सव साजरा केला. गतवर्षी त्यांना अंतिम फेरीत हिमाचल प्रदेशकडून  पराभव पत्करावा लागला होता. १९८३पासून २०१७ पर्यंत तीन तपापेक्षा अधिक काळ सलग विजेतेपद मिळविणाऱ्या रेल्वेला हा पराभव जिव्हारी लागला. त्याचा वचपा त्यांनी हरीयाणाला सहज पराभव करून काढला. महाराष्ट्रातील रोहा-रायगड येथे जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या "६६व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत रेल्वेच्या पुरुषांनी देखिल विजेतेपद मिळविले होते. रेल्वेने या वर्षात दुहेरी मुकुट प्राप्त केला.

     भारतीय रेल्वेने सुरुवात एवढ्या धडाक्यात केली की पूर्वार्धातच दोन लोण देत २३-१३अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात पुन्हा एकदा दोन लोण देत एकतर्फी विजय साजरा केला. या ४८ गुणात त्यांनी एकूण ४लोण देत ८गुण व अवघा १बोनस गुण मिळविला.उर्वरित ३९गुण हे झटापटीतुन मिळविले आहेत. हरीयाणा काय लोणची  परतफेड करू शकले नाही. मात्र त्यांनी पूर्वार्धात एक अव्वल पकड करीत २गुण, तर पूर्वार्धात ७ बोनस आणि उत्तरार्धात ३बोनस करीत एकूण १०गुण मिळविले.एवढाच काय तो आशेचा किरण.  पण रेल्वेच्या विजयात एक दुःखाची झालर आहे. त्यांची बोनसची हुकमी खेळाडू सोनाली शिंगटे हिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.त्यामुळे उपांत्य व अंतिम सामना ती खेळू शकली नाही.

या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने गतविजेत्या हिमाचल प्रदेशचा मध्यांतरातील १०-१० अशा बरोबरी नंतर अटीतटीच्या लढतीत २६-२३असा ,तर रेल्वेने यजमान बिहारचा ३१-१९असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. 

Web Title: Women's National Kabaddi: Indian railway win title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.