महिला रिले संघ सातव्या स्थानी, पुरुष संघ अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 05:18 AM2016-08-21T05:18:29+5:302016-08-21T05:18:29+5:30
भारतीय अॅथ्लेटिक्स पथकाची निराशादायी कामगिरी संपण्याची चिन्हे नाहीत. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये महिला संघ हिटमध्ये सातव्या स्थानी घरसला तर पुरुष संघाला अपात्र घोषित करण्यात आले.
रिओ : भारतीय अॅथ्लेटिक्स पथकाची निराशादायी कामगिरी संपण्याची चिन्हे नाहीत. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये महिला संघ हिटमध्ये सातव्या स्थानी घरसला तर पुरुष संघाला अपात्र घोषित करण्यात आले.
निर्मला शेरॉन, टिंटू लूका, एम. आर. पुवम्मा आणि एनिल्डा थॉमस यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या हिटमध्ये ३ मिनिटे २९.३३ सेकंद वेळ नोंदविली. आठ संघात भारतीय मुली क्युबाच्या तुलनेत पुढे आल्या. मोहम्मद कुंजू, मोहम्मद अनस, अयासामी धारुन तसेच राजीव यांचा समावेश असलेल्या पुरुष संघाने ३ मिनिटे ०२.२४ सेकंद वेळ नोंदविली खरी पण अखेरच्या टप्प्यात धारुन आणि राजीव यांच्यात बॅटन चुकीच्या पद्धतीने हस्तांतरणामुळे संघाला अपात्र ठरविण्यात आले.
१६ संघांमध्ये भारतीय महिला संघ एकूण १३ व्या स्थानावर राहिला. महिला संघाकडून निर्मलाने चांगली सुरुवात केली. पण पहिल्या लॅपमध्ये माघारली. नंतर टिंटू लूकाला पिछाडी भरून काढण्यात अपयश आले. पुवम्मा आणि एनिल्डा यांच्याकडे तर कुठलीही संधी नव्हती. जमैका, ब्रिटन, कॅनडा, इटली, जर्मनी आणि बहमास नंतर भारत सातव्या स्थानी आला. जमैका, ब्रिटन आणि कॅनडा हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर आले. प्रत्येक हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर राहणाऱ्या संघांमधून सर्वोत्कृष्ट वेळ नोंदविणारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
पुरुषांच्या ५० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवीर संदीप कुमार ४ तास ७ मिनिटे वेळ नोंदवित ३४व्या स्थानी आला. संदीपचा राष्ट्रीय विक्रम ३ तास ५६ मिनिटे २२ सेकंद असा आहे. ३ मे २०१४ साली त्याने हा विक्रम नोंदविला होता.
महिलांच्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत आशियाई रौप्य विजेती खुशबीर कौर १ तास ४० मिनिटे ३३ सेकंदांसह ६३ खेळाडूंमध्ये ५४ व्या स्थानावर राहिली. खुशबीरची ही सर्वांत खराब कामगिरी आहे. सपना पुनिया मात्र शर्यत पूर्ण करू शकली नाही.आता स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी पुरुष मॅरेथॉन होईल. त्यात भारताचे धावपटू नीतेंद्रसिंग रावत, खेता राम आणि गोपी टोंकवाला हे आव्हान सादर करतील. (वृत्तसंस्था)