महिला संघाचा शानदार विजय
By admin | Published: February 8, 2017 12:30 AM2017-02-08T00:30:01+5:302017-02-08T00:30:01+5:30
दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी व युवा महिला फलंदाज देविका वैद्य व कर्णधार मिताली राज यांची वैयक्तिक अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारता
कोलंबो : दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी व युवा महिला फलंदाज देविका वैद्य व कर्णधार मिताली राज यांची वैयक्तिक अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने मंगळवारी यजमान श्रीलंकेचा ११४ धावांनी पराभव केला आणि आयसीसी महिला विश्वकप पात्रता फेरीच्या स्पर्धेत शानदार सुरुवात केली.
‘अ’ गटातील या लढतीत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दीप्ती शर्मा (५४), देविका (८९) व मिताली (नाबाद ७०) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद २५९ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा डाव ८ बाद १४५ धावांवर रोखला गेला. या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली.
भारतीय फिरकीपटूंनी सुरुवातीपासून श्रीलंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने १० षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले, तर एकता बिश्तने २७ धावांत २ फलंदाजांना माघारी परतवले. फलंदाजीमध्ये छाप सोडणाऱ्या दीप्तीने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. तिने १० षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला.
श्रीलंका संघाने सुरुवातीपासून नियमित अंतरात विकेट गमावल्या. त्यांच्यातर्फे हसीनो परेराने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली, तर चमारी अटापट्टू (३०) व ईर्शानी कौशल्या (२६) यांनीही संघर्षपूर्ण खेळी केली. त्याआधी, दीप्तीने भारताला संथ, पण चांगली सुरुवात करून दिली. मोना मेश्राम (६) पाचव्या षटकात बाद झाल्यानंतर दीप्ती व देविका यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मितालीने चमकदार खेळी करताना देविकाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४९ आणि हरमनप्रीत कौरसोबत (२०) चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. व्ही. कृष्णमूर्ती १० धावा काढून नाबाद राहिली. दीप्ती व देविका यांनी कारकिर्दीत प्रथमच अर्धशतके झळकावली.
देविकाने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार लगावले, तर मितालीने ६२ चेंडूंमध्ये ८ चौकार ठोकले. दीप्तीच्या ९६ चेंडूंच्या खेळीमध्ये ४ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. श्रीलंकेतर्फे उदेशिका प्रबोधिनीने दोन, तर श्रीपाली वीराकोडी व इनोशी प्रियदर्शिनी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कारकिर्दीतील दुसरा सामना खेळणारी देविका सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. बांगलादेशाने ‘ब’ गटात पापुआ न्यूगिनी संघाचा ११८ धावांनी पराभव केला. बांगलादेशाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २१५ धावा फटकावल्या आणि प्रतिस्पर्धी पापुआ न्यूगिनी संघाचा डाव ३२.१ षटकांत ९७ धावांत गुंडाळला. (वृत्तसंस्था)