महिला संघाचे ‘मिशन सेमीफायनल’
By admin | Published: July 8, 2017 01:24 AM2017-07-08T01:24:58+5:302017-07-08T01:24:58+5:30
आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज शनिवारी द. आफ्रिकेला लोळवून उपांत्य फेरी
लीसेस्टर : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज शनिवारी द. आफ्रिकेला लोळवून उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने खेळणार आहे.
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंकेला सहज पराभूत करीत गुणतालिकेत आॅस्ट्रेलियापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. द. आफ्रिकेने चारपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना त्यांना गमवावा लागला. हा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यांचा एक सामना रद्द झाला.
भारतीय संघ जबर फॉर्ममध्ये आहेच शिवाय अलीकडे द. आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक पात्रता फेरी आणि चौरंगी मालिकेत मिळालेल्या यशानंतर खेळाडूंना चांगलाच हुरुप आला.
भारताने मागच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध २३२ धावांचा यशस्वी बचाव केला होता. या सामन्यात दीप्ती शर्माने ७८ तर मितालीने ५३ धावा केल्या. त्याआधी स्मृती मानधनाने ६८ धावा केल्या होत्या. स्मृतीने आतापर्यंत २०६ आणि मितालीने १७८ धावा ठोकल्या आहेत. गोलंदाजीत एकता बिश्त, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या फिरकी त्रिकूटाने आतापर्यंत १९ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
दुसरीकडे मागच्या सामन्यात द. आफ्रिका संघ इंग्लंडकडून ६८ धावांनी पराभूत झाला. भारताविरुद्ध मुसंडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इंग्लंडने त्या सामन्यात विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी सर्वांत मोठी धावसंख्या नोंदविली होती.
उभय संघ असे
भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत परविन.
दक्षिण आफ्रिका : डेन वॉन नीकर्क (कर्णधार), तृषा चेट्टी, मोसेलिन डॅनियल्स, नेदिन डी क्लार्क, मिगनोन डु प्रीज, शबनम इस्माईल, मारिजेन केप, अयाबोंगा खाका, मासाबाता क्लास, लिजेल ली, सुन लूस, रेसिबे तोजाखी, अॅन्ड्री स्टेन, क्लो ट्रायन, लारा वोलवार्ट आणि ओडिन कर्स्टन.