महिला विश्वचषक आॅस्ट्रेलियाची विजयी सलामी
By admin | Published: June 27, 2017 12:52 AM2017-06-27T00:52:15+5:302017-06-27T00:52:15+5:30
निकोल बोल्टनच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर संभाव्य विजेत्या आॅस्टे्रलियाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार विजयी सलामी
टाँटन : निकोल बोल्टनच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर संभाव्य विजेत्या आॅस्टे्रलियाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार विजयी सलामी देताना वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना आॅस्टे्रलियाने ३८.१ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात २०५ धावा केल्या. बोल्टनने बेथ मुनीसह १७१ धावांची सलामी देत विजयावर शिक्कामोर्तब केले.
कांऊटी ग्राऊंड येथे झालेल्या या सामन्यात विंडिज महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. दखल घेण्याची बाब म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेण्यात विंडिज कर्णधार स्टेफनी टेलर गोंधळून गेली आणि तिने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिला प्रथम क्षेत्ररक्षण घ्यायचे होते. याचा फटका पुर्ण संघाला सामन्यात बसला. विंडिजचा डाव ४७.५ षटकात २०४ धावांमध्ये आॅसीने गुंडाळला. वेस्ट इंडिजचे अखेरचे ७ फलंदाज केवळ ४७ धावांमध्ये तंबूत परतले. आॅस्टे्रलियाने हा सामना अत्यंत एकतर्फी ठरवताना ३८.१ षटकांमध्येच विजयी लक्ष्य गाठले. (वृत्तसंस्था)
बोल्टनने ११६ चेंडूत १४ चौकार मारताना नाबाद १०७ धावा काढल्या. मूनीने देखील ८५ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ७० धावा काढल्या. या दोघींनी १७१ धावांची सलामी देत संघाच्या विजयाची औपचारीकता शिल्लक ठेवली. मूनीनंतर विंडिज संघाने आॅसी कर्णधार मेग लँनिंग (१२) हिला झटपट बाद केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
तत्पूर्वी, सलामीवीर हायले मॅथ्यूज (४६), कर्णधार टेलर (४५), चेडीन नेशन (३९) आणि डींद्रा डॉट्टिन (२९) यांच्यामुळे वेस्ट इंडिजला २००चा टप्पा पार करता आला. एलिस पेरी हिने ४७ धावांत ३ बळी घेतले, तर क्रिस्टन बिम्सने ३० धावांत २ आणि जेस जॉन्सन हिने ३९ धावांत २ बळी घेत विंडिज फलंदाजीला खिंडार पाडले. मेगन स्कटने एक बळी घेतला.
आता, २९ जूनला आॅस्टे्रलियाचा संघ श्रीलंकाविरुध्द भिडेल, तर त्याच दिवशी वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाविरुद्ध दोन हात करेल. (वृत्तसंस्था)