महिला विश्वचषक क्रिकेट : ऑस्ट्रेलियाची जिरवली, भारत अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 05:56 AM2017-07-21T05:56:48+5:302017-07-21T05:56:48+5:30

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत मोक्याच्या वेळी झुंजार अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत दीप्ती शर्माने घेतलेल्या बहुमूल्य बळीच्या जोरावर भारताने महिला

Women's World Cup: Australia's Jirvali, India in the final round | महिला विश्वचषक क्रिकेट : ऑस्ट्रेलियाची जिरवली, भारत अंतिम फेरीत

महिला विश्वचषक क्रिकेट : ऑस्ट्रेलियाची जिरवली, भारत अंतिम फेरीत

Next

डर्बी : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत मोक्याच्या वेळी झुंजार अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत दीप्ती शर्माने घेतलेल्या बहुमूल्य बळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अष्टपैलू हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या तुफानी दीड शतकानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या भारताने गतविजेत्या बलाढ्य आॅस्टे्रलियाला ३६ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४२ षटकांत ४ बाद २८१ धावा केल्यानंतर आॅस्टे्रलियाला ४०.१ षटकांत २४५ धावांवर थोपवले. आता, विश्वविजेतेपदासाठी भारतीय महिला यजमान इंग्लंडविरुद्ध रविवारी २३ जुलैला लॉडर््स मैदानावर लढतील़
भारताने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्टे्रलियन संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली भासला. सलामीवीर बेथ मूनी (१) आणि हुकमी फलंदाज व कर्णधार मेग लॅनिंग (०) झटपट परतल्याने आॅसी संघ कमालीचा दडपणाखाली आला.
शिखा पांडे आणि झूलन गोस्वामी यांनी हे दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवताना भारताच्या विजयातील मुख्य अडसर दूर केला. यानंतर फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत आॅसी संघाला फटकेबाजीपासून दूर ठेवले. आवश्यक धावगती सतत वाढत राहिल्याने कांगारुंवरील
दडपण स्पष्ट दिसू लागले. एलसी विल्लानी हिने झुंज देताना ५८ चेंडंूत १३ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली.
दुसरीकडे ब्लॅकवेलने अखेरपर्यंत किल्ला लढवताना सामना जवळजवळ आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकवला होता. तिने अखेरची फलंदाज क्रिस्टन बीम्ससह शेवटच्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून आॅस्टे्रलियाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, दीप्तीने ४१व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तिला त्रिफळाचीत करून भारताला विजयी केले. ब्लॅकवेलने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९० धावांची शानदार खेळी केली. दीप्तीने ३, तर झूलन गोस्वामी, शिखा पांडे यांनी प्रत्येकी २ बळी घेत आॅस्टे्रलियाच्या आव्हानातली हवा काढली.
तत्पूर्वी, हरमनप्रीत कौरने आॅसी गोलंदाजीची पिसे काढताना ११५ चेंडंूत २० चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करून नाबाद १७१ धावांची तुफानी खेळी केली. पावसाच्या व्यत्ययानंतर उशिराने सुरू झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधना (६) व पूनम राऊत (१४) या सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार मिताली राज (३६) व हरमनप्रीत यांनी डाव सावरला. हरमनप्रीतने या वेळी भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी केली.
भारताची अडखळती सुरुवात झाल्यानंतर मिताली - हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. मिताली २५व्या षटकात बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने सगळी सूत्रे आपल्याकडे घेत दीप्ती शर्मासह चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची निर्णायक भागीदारी केली. यामध्ये दीप्तीचा वाटा केवळ २५ धावांचा राहिला. यावरूनच हरमनप्रीतचा धडाका लक्षात येतो. हरमनप्रीतने अखेरपर्यंत नाबाद राहताना भारताला धावांचा एव्हरेस्ट उभारून दिला. तिच्या हल्ल्यापुढे आॅस्टे्रलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई झाली. (वृत्तसंस्था)

धावफलक :
भारत : स्मृती मानधना झे. विल्लानी गो. स्कट ६, पूनम राऊत झे. मूनी गो. गार्डनर १४, मिताली राज त्रि .गो. बीम्स ३६, हरमनप्रीत कौर नाबाद १७१, दीप्ती शर्मा त्रि. गो. विल्लानी २५, वेदा कृष्णमुर्ती नाबाद १६. अवांतर - १३ धावा. एकूण ४२ षटकात ४ बाद २८१ धावा.
गोलंदाजी : मेगन स्कट ९-०-६४-१; एलिस पेरी ९-१-४०-०; जेस जॉनसेन ७-०-६३-०; अ‍ॅश्लेघ गार्डनर ८-०-४३-१; क्रिस्टन बीम्स ८-०-४९-१; एलीस विल्लानी १-०-१९-०.
आॅस्टे्रलिया : निकोल बोल्टन झे. व गो. दीप्ती १४, बेथ मूनी त्रि. गो. शिखा १, मेग लॅनिंग त्रि. गो. झुलन ०, एलिस पेरी झे. सुषमा गो. शिखा ३८, एलिसे विल्लानी झे. स्मृती गो. गायकवाड ७५, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल नाबाद त्रि. गो. दीप्ती ९०, अलिसा हेली झे. शिखा गो. झुलन ५, अश्लेघ गार्डनर झे. मिताली गो. यादव १, जेस जॉनसेन धावबाद (झुलन) १, मेगन स्कट झे. झुलन गो. दीप्ती २, क्रिस्टन बीम्स नाबाद ११. अवांतर - ७. एकूण : ४०.१ षटकात सर्वबाद २४५ धावा.
गोलंदाजी : झुलन गोस्वामी ८-०-३५-२; शिखा पांडे ६-१-१७-२; दीप्ती शर्मा ७.१-०-५९-३; राजेश्वरी गायकवाड ९-०-६२-१; पूनम यादव ९-०-६०-१; वेदा कृष्णमुर्ती १-०-११-०.

बिग बॅशचा फायदा... : हरमनप्रीतला आॅस्टे्रलियन खेळाडूंचा आणि त्यांच्या खेळाचा चांगला अनुभव असल्याने बेधडक खेळ केला. जून २०१६ मध्ये हरमनप्रीतने आॅस्टे्रलियातील टी २० स्पर्धा बिग बॅशमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत खेळणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली होती. त्यामुळेच तिने आॅस्टे्रलियन गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेतला. विशेष म्हणजे आॅसी स्पिनर्सला तिने जम बसवू न देता पुढे येत त्यांचा चोपले.

Web Title: Women's World Cup: Australia's Jirvali, India in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.