महिला कुस्ती चाचणी : साक्षी मलिकवर सोनमची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:59 AM2020-01-05T05:59:30+5:302020-01-05T05:59:35+5:30
दोनवेळची विश्व कॅडेट चॅम्पियन सोनम मलिक हिने शनिवारी महिला कुस्ती चाचणीत रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती मल्ल साक्षी मलिक हिच्यावर खळबळजनक मात केली.
लखनौ : दोनवेळची विश्व कॅडेट चॅम्पियन सोनम मलिक हिने शनिवारी महिला कुस्ती चाचणीत रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती मल्ल साक्षी मलिक हिच्यावर खळबळजनक मात केली. दुसरीकडे ज्युनियर अंशु मलिक हिने विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेती पूजा ढांढा हिच्यावर मात करीत आशियाई चॅम्पियनशिपचे तिकीट पक्के केले. सोनम आणि अंशु यांच्यापुढे सुरुवतीलाच बलाढ्य मल्लांचे आव्हान होते. मात्र, दोघींनीही साहसी कामगिरीच्या जोरावर बाजी मारली.
फायनलमध्ये सोनमने साधिकाचा ४-१ असा पराभव करीत ६२ किलो गटात भारतीय संघात स्थान निश्चित केले. अंशुने पूजाला धूळ चारल्यानंतर ५७ किलो गटाच्या अंतिम लढतीत मानसीवर मात केली. अन्य वजन गटात आश्चर्यकारक निकालांची नोंद होऊ शकली नाही. विनेश फोगाट (५३ किलो) आणि दिव्या कांकरान (६८ किलो) यांनी आपापल्या लढती सहज जिंकल्या. निर्मला देवी (५० किलो) आणि किरण गोदारा (७६ किलो) यांनीदेखील चाचणीत बाजी मारली. विजेते सर्व महिला मल्ल १५ ते १८ जानेवारीपर्यंत रोममध्ये होणाऱ्या रँकिंग सीरिजमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यानंतर नवी दिल्लीत होणाºया आशियाई चॅम्पियनशिपमध्येही हे खेळाडू सहभागी होतील. या दोन्ही स्पर्धांमध्ये मल्लांनी पदके जिंकल्यास २७ ते २९ मार्च या कालावधीत जियान येथे होणाºया आशियाई आॅलिम्पिक पात्रता फेरीत त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. (वृत्तसंस्था)