मुंबई सुपर ओव्हरमध्ये विजयी
By admin | Published: April 30, 2017 05:40 AM2017-04-30T05:40:05+5:302017-04-30T05:40:05+5:30
हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी चित्तथरारक विजय मिळवताना
राजकोट : हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी चित्तथरारक विजय मिळवताना प्लेआॅफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.
आयपीएल १0 मधील पहिल्या टाय झालेल्या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या तर विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य मिळालेल्या लायन्सला फक्त ६ धावाच करता आल्या.
त्याआधी लायन्सच्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेलच्या ४४ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह फटकावलेल्या ७0 धावा आणि कृणाल पंड्याच्या २९ धावांच्या खेळीनंतरही मुंबई इंडियन्स २0 षटकात १५३ धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे सामना टाय झाला. लायन्ससाठी आशा उंचावण्याचे श्रेय बासिल थंपी (२९ धावांत ३ बळी) आणि फॉकनर (३४ धावांत २ बळी) यांना जाते. या विजयामुळे मुंबईचे ९ सामन्यात १४ गुण झाले आहेत. लायन्सचे ९ सामन्यात ६ गुण झाले असून ते पाचव्या स्थानी कायम आहेत.
पार्थिव पटेलच्या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईचा संघ लिलया विजय मिळवणार अशीच चिन्हे होती. एकवेळ त्यांची स्थिती ४ बाद १२७ अशी होती; परंतु त्यांनी अखेरचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत गमावले. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज मुंबईला होती आणि कृणाल पंड्या याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकल्यानंतरही मुंबईला या षटकात १0 धावाच करता आल्या. त्याआधी कृणाल पंड्याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ९ बाद १५३ या धावसंख्येवर रोखले होते. कृणालने त्याच्या कारकीर्दीत सर्वोत्तम गोलंदाजी करताना १४ धावांत ३ गडी बाद केले.
जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ३२ व ३३ धावा मोजल्या. हरभजनसिंगने २३ धावंत १ गडी बाद केला. लायन्सकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक ४८ धावा केल्या. अँड्र्यू टाय (१२ चेंडूंत २५ आणि जेम्स फॉकनर (२७ चेंडूंत २१ धावा) यांनी आठव्या गड्यासाठी १९ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी करताना संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
सुपर ओव्हर
मुंबई फलंदाजी : फलंदाज : जोस बटलर व केरॉन पोलार्ड, गोलंदाज : जेम्स फॉकनर, पहिला चेंडू : बटलर १ धाव, दुसरा चेंडू : पोलार्ड ४ धावा, तिसरा चेंडू : पोलार्ड षटकार, चौथा चेंडू : पोलार्ड फिंचकरवी झेलबाद, पाचवा : चेंडू बटलर इशान किशनकरवी झेलबाद, एकूण : ५ चेंडूंत २ बाद ११
गुजरात लायन्स : फलंदाज : ब्रॅण्डन मॅक्युलम व अॅरोन फिंच, गोलंदाज : जसप्रीत बुमराह, पहिला चेंडू : नो बॉल, फ्री हिट (फलंदाज : फिंच), पहिला चेंडू : लेगबाय (फलंदाज : फिंच), दुसरा चेंडू : वाईड (फलंदाज : मॅक्युलम), दुसरा चेंडू : मॅक्युलम 0 धाव, तिसरा चेंडू : बाय (फलंदाज : मॅक्युलम), चौथा चेंडू : फिंच 0 धाव, पाचवा : फिंच १ धाव, सहावा चेंडू : मॅक्युलम १ धाव, एकूण : एका षटकात बिनबाद ६ धावा.
संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २0 षटकांत ९ बाद १५३. (इशान किशन ४८, रवींद्र जडेजा २८, टाय २५. कृणाल पंड्या ३/१४, बुमराह २/३२, मलिंगा २/३३)
मुंबई इंडियन्स : २0 षटकांत सर्वबाद १५३. (पार्थिव पटेल ७0, कृणाल पंड्या २९, पोलार्ड १९. बासिल थंपी ३/२९, फॉकनर २/३४)