विजय-पूजाराची शतके, शेवटच्या सत्रात भारताला तीन धक्के
By admin | Published: November 11, 2016 11:25 AM2016-11-11T11:25:13+5:302016-11-11T17:24:01+5:30
तिस-या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही शेवटच्या सत्रात कमी धावांच्या अंतराने तीन गडी बाद झाल्याने भारताचा डाव काहीसा अडचणीत आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. ११ - तिस-या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही शेवटच्या सत्रात कमी धावांच्या अंतराने तीन गडी बाद झाल्याने भारताचा डाव काहीसा अडचणीत आला आहे. दिवसअखेर भारताच्या ४ बाद ३१९ धावा झाल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद (२६) धावांवर मैदानात आहे. इंग्लंडपेक्षा भारत अजूनही २१८ धावांनी पिछाडीवर आहे.
दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर नाईट वॉचमन अमित मिश्राला (०) अन्सारीने हमीदकरवी झेलबाद केले. त्याआधी दमदार शतक झळकवणारा मुरली विजय (१२६) धावांवर बाद झाला. त्याला राशिदने हमीदकरवी झेलबाद केले. गौतम गंभीरच्या रुपाने सकाळच्या सत्रात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पूजारा जोडीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर हुकूमत गाजवली.
एकबाजूने दमदार फलंदाजी करणारा चेतेश्वर पूजारा (१२४) धावांवर बाद झाला. स्टोक्सने त्याला कुककरवी झेलबाद केले. पूजारा आणि विजयने दुस-या विकेटसाठी २११ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी मुरली विजय (११२) आणि चेतेश्वर पूजारा (१२४) यांच्या दमदार शतकाच्या बळावर इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले. दोघांनी चौफेर फटकेबाजी करताना खो-याने धावा वसूल केल्या. इंग्लंडचे गोलंदाज या जोडीपुढे हतबल झाले होते. पुजाराने २२४ चेंडूत १०० धावा केल्या.
इंग्लंडने पहिल्या डावात ५३७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतानेही चांगली सुरुवात केली. ब्रॉडच्या गोलंदाजीवर गंभीर २९ धावांवर पायचीत झाला. इंग्लंडकडून रुट (१२४), मोईन अली (११७) आणि स्टोक्स (१२८) या तिघांच्या दमदार शतकाच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डाव ५३७ धावांवर घोषित केला.
बांगलादेशात निराशाजनक कामगिरी करणा-या इंग्लिश संघाचा भारतात निभाव लागणार नाही असे बोलले जात होते. पण पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातच इंग्लंड संघाने टीकाकारांना खोडून काढले. भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.