चाहत्यांच्या शुभेच्छांच्या बळावर मेडल जिंकणार

By admin | Published: June 28, 2016 06:23 AM2016-06-28T06:23:18+5:302016-06-28T06:23:18+5:30

प्रेमाच्या बळावर आपण रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकू, असा विश्वास आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने व्यक्त केला़

Won the winners of the wishes of the fans | चाहत्यांच्या शुभेच्छांच्या बळावर मेडल जिंकणार

चाहत्यांच्या शुभेच्छांच्या बळावर मेडल जिंकणार

Next

चन्नवीर मठ,

बार्शी- सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: बार्शीकरांच्या प्रेमाने आपण भारावलो आहोत़ आपले स्वागत अशा पद्धतीने होईल याची जराही कल्पना नव्हती़ या प्रेमाच्या बळावर आपण रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकू, असा विश्वास आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने व्यक्त केला़
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर प्रथमच तिचे बार्शीत सोमवारी आगमन झाले़ तिच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत क्रीडारसिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ बार्शीत ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्जद्वारे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची शुभेच्छांची फलके शहरात गल्लोगल्ली दिसत आहेत़ ज्येष्ठ नेते भाऊसाहेब झाडबुके आणि प्रभाताई झाडबुके यांची नात असलेल्या प्रार्थना ठोंबरेच्या स्वागतासाठी व तिला रिओ आॅलिम्पिकला शुभेच्छा देण्यासाठी तरुण, विविध पदाधिकाऱ्यांची गर्दी सकाळपासूनच प्रभाशंकर बंगल्यात जमत होती़
बार्शीचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिलेल्या तथा माजी आमदार प्रभाताई झाडबुके या आवर्जून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होत्या़ सोबत प्रार्थनाची आई वर्षाताई ठोंबरे, थोरली बहीण प्रांजल या दोघींचीही घाई सुरू होती़ दरम्यान, वडील गुलाबराव ठोंबरे यांच्यासमवेत प्रार्थनाचे प्रभाशंकर या बंगल्यावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ वर्षाताई यांनी प्रार्थना हिचे औक्षण करून पेढा भरवून स्वागत केले़ या वेळी बार्शीतील अनेक मान्यवर उपस्थित होते़
बंगल्यात प्रवेश केल्यानंतर आजी प्रभाताई यांनी आपल्या लाडक्या नातीला कडकडून मिठी मारली़ प्रार्थनाने आजीचे आशीर्वाद घेतले़ या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष राजीव देसाई यांनीही प्रार्थनाचे अभिनंदन केले़ माध्यम प्रतिनिधींच्या गराड्यात प्रार्थनाने घरात प्रवेश केला़
>‘प्रार्थना ही माझी दुसरी मुलगी’
सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा हे आपली खूप काळजी घेतात़ सानियाप्रमाणेच त्यांनी आपल्याला दुसरी कन्या मानल्याचे उद्गार प्रार्थना ठोंबरे हिने काढले़
सध्या ती सानिया मिर्झा हिच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे़ त्यामुळे सानिया व प्रार्थना यांच्या कुटुंबीयांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे़
इम्रान मिर्झा यांनी प्रार्थना ठोंबरे हिला दुसरी कन्या मानले आहे़ याच पार्श्वभूमीवर प्रार्थनाने आपल्या भावनांना वाट करून दिली़
सर्वांत आधी प्रार्थना
लोकमत आॅनलाइनवऱ़़
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर बार्शीची सुकन्या
प्रार्थना ठोंबरे हिचे प्रथमच बार्शीत आगमन झाल्यानंतर तिचे
आॅनलाइन लाइव्ह चित्रण सर्वप्रथम
‘लोकमत’ने दिले़ प्रभाशंकर बंगल्याच्या बाहेर फँड्री व सैराट या मराठी चित्रपटांत असलेल्या केमच्या हलगी पथकाच्या ठेक्यावर तरुणाईचे जोरदार झिंगाट सुरू होते़ या हलगी पथकाला पाहण्यासाठी मुलीही मागे नव्हत्या़
या वेळी तरुणांबरोबर तरुणींची संख्याही लक्षणीय होती़ विविध रंगांचे फटाके, आतषबाजी आणि गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात प्रार्थनाची खुल्या जीपमधून मिरवणूक निघाली़ जीपमध्ये प्रार्थनासमवेत गुलाबराव, वर्षाताई आणि प्रांजल हेही उपस्थित होते़

Web Title: Won the winners of the wishes of the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.