‘एएआय’च्या निवडणुकीला मान्यता देण्यास विश्व तिरंदाजी महासंघाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:50 AM2019-01-18T06:50:56+5:302019-01-18T06:51:07+5:30
सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता निवडणूक घेण्यात आल्यामुळे अलीकडेच झालेल्या निवडणुकीला मान्यता देण्यात येणार नाही.
नवी दिल्ली : विश्व तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेच्या (एएआय) अलीकडेच झालेल्या निवडणुकीला मान्यता देण्यास नकार दिला. त्यामुळे ‘एएआय’वर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यताही आहे.
विश्व तिरंदाजी महासंघाने बीव्हीपी राव यांना कळविले आहे की, ‘सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता निवडणूक घेण्यात आल्यामुळे अलीकडेच झालेल्या निवडणुकीला मान्यता देण्यात येणार नाही.’ २२ डिसेंबरला झालेल्या एएआयच्या निवडणुकीत राव यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.
विश्व महासंघाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘विश्व तिरंदाजी कार्यकारी बोर्ड २२ डिसेंबरला झालेल्या आमसभेच्या निवडणुकीच्या निकालांना मान्यता देऊ शकत नाही, हे आम्हाला कळवावे लागत आहे. त्याचसोबत अध्यक्ष म्हणून आपली झालेली निवड व सर्व सदस्यांची निवड आम्हाला मान्य करता येणार नाही.’ ज्या घटनेनुसार निवडणूक आयोजित करण्यासाठी त्या घटनेला कधीच अधिकृत मान्यता मिळालेली नव्हती. त्या घटनेचा केवळ निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकार केला होता. त्यामुळे विश्व तिरंदाजी महासंघाने हा निर्णय घेतला.
विश्व तिरंदाजी महासंघाचे महासचिव टॉम डिलेन यांनी दिलेल्या पत्रानुसार या प्रकरणाला दुजोरा देण्यासाठी २५ जानेवारी २०१९ पूर्वी तुमच्याकडून २२ डिसेंबरला झालेल्या आमसभेची इतिवृत्त पुस्तिका मागविण्यात येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर विश्व तिरंदाजी कार्यकारी बोर्ड भारतीय तिरंदाजी संघटनेच्या संभाव्य निलंबनाबाबत निर्णय घेईल.