नीरज चोप्राने 'जग' जिंकले! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:00 AM2023-08-28T01:00:10+5:302023-08-28T01:00:41+5:30
World Athletics Championship 2023 Men's Javelin Final- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा अंजु बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर पहिला भारतीय ठरला होता.
World Athletics Championship 2023 Men's Javelin Final- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा अंजु बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर पहिला भारतीय ठरला होता. पण, आज नीरजने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे वैयक्तिक पदक जिंकून इतिहास रचला. त्याने २०२२ मध्ये जागतिक स्पर्धेचे रौप्यपदक जिंकले होते, परंतु आज त्याने गोल्डन कामगिरी केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात फेकलेला ८८.१७ मीटर लांब भाला, सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी पुरेसं ठरलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ( Arshad NADEEM) रौप्यपदक जिंकून सर्वांना अचंबित केले.
88.17 Meters for 🥇
— JioCinema (@JioCinema) August 27, 2023
Neeraj Chopra becomes 1st 🇮🇳 athlete to win a gold medal at the #WorldAthleticsChampionships 😍
Watch the best of #Budapest23 - FREE only on #JioCinema ✨#WAConJioCinemapic.twitter.com/le562o9zp2
नीरजने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली होती. डी. पी. मनू ( ८१.३१ मी.) व किशोर जेना ( ८०.५५ मी.) हे अनुक्रमे ६ व ९ व्या क्रमांकावरून फायनलमध्ये पोहोचले होते. अंतिम फेरीत फिनलँडच्या ऑलिव्हर हलँडर आणि झेक प्रजासत्ताकच्या याकुब व्हॅडलेज्च यांनी पहिल्या प्रयत्नात अनुक्रमे ८३.३८ मी. व ८२.५९ मी. लांब भाला फेकला. नीरजचा प्रयत्न फाऊल ठरला. मनूने ७९.४४ मी. आणि किशोरने ७५.७० मीटर लांब भाला फेकला. पहिल्या प्रयत्नाअखेरीस नीरज १२वा राहिला. याकुबने दुसऱ्या प्रयत्नात ८४.१८ मीटर अंतर गाठून पहिले स्थान पटकावले. पण नीरजने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ८८.१७ मीटर लांब भाला फेकला अन् टॉपर ठरला. या फेरीअखेरीस जर्मनीचा ज्युलियन वेबर ( ८५.७९ मी.) हा नीरजच्या पाठोपाठ होता. किशोरनेही ८२.८२ मीटर लांब भाला फेकला.
WHAT A THROW! 🚀#NeerajChopra launches a huge 88.17m throw in his second attempt to take the lead in #WACBudapest23. 🤩#Budapest23#Javelin#CraftingVictories 🇮🇳 pic.twitter.com/S8eurzZ2iJ
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) August 27, 2023
तिसऱ्या प्रयत्नात नीरजला ८६.३२ मीटर लांब भाला फेकता आला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सर्वांना आश्चर्यचकीत करत ८७.८२ मीटर भाला फेकून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. मनूने ८३.७२ मीटर अंतर गाठून पाचवे स्थान पटकावले. किशोरने फाऊल केला, परंतु दुसऱ्या प्रयत्नातील कामगिरीच्या जोरावर तो टॉप ८ मध्ये कायम राहिला. फायनलमध्ये टॉप ८ मध्ये तीन भारतीय राहण्याची ही पहिलीच व ऐतिहासिक कामगिरी ठरली. नदीमने चौथ्या प्रयत्नात ८७.१५ मीटर लांब भाला फेकला, तर नीरजचा भाला ८४.६४ मीटर लांब पोहोचला. किशोर पाचव्या प्रयत्नात ८४.७७ मीटर लांब भालाफेक करून चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. जर्मनीच्या याकुबने पाचव्या प्रयत्नात ८६.६७ मीटर अंतर गाठून कांस्यपदक निश्चित केले. शेवटच्या प्रयत्नता एकाही खेळाडूला नीरजच्या भालाफेकी जवळ पोहोचता आले नाही आणि भारताच्या खेळाडूने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.
नीरजची सुवर्ण कामगिरी
नीरजने यापूर्वी २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. २०१६ मध्ये नीरज हे नाव जगभरात प्रथम पोहोचले. त्याने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा ८६.४८ मीटर लांब भालाफेकून जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याशिवाय डायमंड लीग ( २०२२), आशियाई स्पर्धा ( २०१८), राष्ट्रकुल स्पर्धा ( २०१८), आशियाई अजिंक्यपद ( २०१७), दक्षिण आशियाई ( २०१६) स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे.