Murali Sreeshankar, World Athletics Championships : मुरली श्रीशंकरने निराश केले, राष्ट्रीय विक्रमी कामगिरी केली असती तरी पदक होतं पक्क, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 08:16 AM2022-07-17T08:16:59+5:302022-07-17T08:19:43+5:30
World Athletics Championships 2022 : भारताच्या मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar) जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील लांब उडीच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्यात अपयश आले.
Murali Sreeshankar ( long Jump) World Athletics Championships 2022 : भारताच्या मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar) जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील लांब उडीच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्यात अपयश आले. ८.३६ मीटर हा राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या श्रीशंकरला फायलनमध्ये ७.९६ मीटर लांब उडीच मारता आली. सहापैकी ३ प्रयत्नात त्याच्याकडून फाऊल झाले. त्याने सहाव्या प्रयत्नात ७.८३ मीटर लांब उडी मारली अन् भारताची पदकाची आशाही मावळली. श्रीशंकरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनच्या जिअँनन वँगने ८.३६ मीटरसह सुवर्णपदक नावावर केले, तर ग्रीसच्या मिल्टिआडीस तेंटोग्लोऊला ८.३२ मीटरसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पहिल्या प्रयत्नात ७.९६ मीटर लांब उडी मारली आणि तो पहिल्या प्रयत्नांत अव्वल स्थानावर राहिला. चिनचा जिअँनन वँग ७.९४ मीटरसह दुसऱ्या स्थानी राहिला. मुरली श्रीशंकरने दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला. अमेरिकेच्या स्टेफिन मॅकार्टरने ८.०४ मीटरसह आघाडी घेतली. त्यालाही ग्रीसच्या मिल्टिआडीस तेंटोग्लोऊने ८.३० मीटरसह मागे टाकले. दुसऱ्या फेरीअखेर ग्रीससाच खेळाडू टॉपर राहिला. त्याच्या आसपासही कुणी पोहोचले नाही. स्वित्झर्लंडचा सिमॉन इहॅमर ( ८.१६ मीटर) व क्युबाचा मायकेल मासो ( ८.१५ मीटर) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
This man♥️ pic.twitter.com/ycLGnp10uH
— Prithvi (@Eighty7_Fifty8) July 17, 2022
मुरली श्रीशंकरची सातव्या स्थानी घसरण झाली. तिसऱ्या प्रयत्नातही श्रीशंकरकडून फाऊल झाले. चौथ्या प्रयत्नात त्याने ७.८९ मीटर लांब उडी मारली. पाचव्या प्रयत्नातही फाऊल झाल्याने श्रीशंकरचा पदकाचा मार्ग बंद झाल्यात जमा झाला. ऑलिम्पिक २०२० मधील सुवर्णपदक विजेत्या मिल्टिआडीस तेंटोग्लोऊ याने पाचव्या प्रयत्नात ८.३२ मीटर उडी मारून येथे पदक पक्के केले. अखेरच्या प्रयत्नात श्रीशंकरला ७.८३ मीटर लांब उडी मारता आली अन् भारताच्या पदकाच्या आशाही मावळल्या. चीनच्या वँगने ८.३६ मीटर लांब उडी मारून थेट अव्वल स्थानावर कब्जा केला.
२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मुरली श्रीशंकरची भारतीय संघात निवड झाली होती, परंतु १० दिवस आधी त्याला appendicitis झालं अन् त्याला माघार घ्यावी लागली. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो लिक्विड डाएटवर होता. त्यामुळे त्याचे वजन प्रचंड कमी झाले होते आणि परिणामी त्याला नीट चालताही येत नव्हते. पण, दोन महिन्यांत त्याने स्वतःला पुन्हा तंदुरुस्त केले आणि २०१८च्या आशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ७.४७ मीटर लांब उडीसह कांस्यपदक नावावर केले. २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत ७.९५ मीटर लांब उडीसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
त्याने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. चारवेळा राष्ट्रीय विजेत्या राहिलेल्या मुरली श्रीशंकरने २०२२मध्ये ८.३६ मीटर लांब उडी मारून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. भुवनेश्वर येथे २०१८मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ८.२० मीटर लांब उडी मारून पहिल्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्या कामगिरीच्या जोरावर त्याने २०१९मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती, परंतु त्या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही. ८.२६ मीटर नोंदसह त्याने २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित करताना नवा राष्ट्रीय विक्रम केला होता.
मुरली श्रीशंकरचे वडील एस मुरली हे माजी तिहेरी उडीपटू आहेत आणि त्यांनी दक्षिण आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरली सराव करतो. चार वर्षांचा असल्यापासून मुरलीचा सराव सुरू आहे. मुरलीने १० वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेत ५० मीटर व १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता, परंतु १३व्या वर्षी तो लांब उडीकडे वळला. त्याची आई के एस बिजिमोल यांनी १९९२च्या आशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहीण श्रीपार्वती ही हेप्टॅथलॉन खेळते. ऑगस्ट २०१९मध्ये मुरली श्रीशंकरने मॅथेमॅटिक्सम BSc पूर्ण केले.