विश्व अॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून
By admin | Published: August 21, 2015 10:46 PM2015-08-21T22:46:51+5:302015-08-21T22:46:51+5:30
जमैकाचा सुपरफास्ट धावपटू उसेन बोल्ट शनिवारपासून (दि. २२) सुरू होत असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी शंभर मीटर
बीजिंग : जमैकाचा सुपरफास्ट धावपटू उसेन बोल्ट शनिवारपासून (दि. २२) सुरू होत असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी शंभर मीटर हिटमध्ये सहभागी होणार आहे. दुसरीकडे ब्रिटनचा मोहंमद फराह हा १० हजार मीटर शर्यतीत सलग सहाव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.
बर्ड्स नेस्ट स्टेडियममध्ये सात वर्षांपूर्वी बोल्टने बीजिंग आॅलिम्पिकमध्ये तीन सुवर्णांची कमाई केली होती. जखमेमुळे सत्राच्या प्रारंभी ६ आठवडे बाहेर राहिल्यानंतर बोल्टने गेल्या महिन्यात लंडन डायमंड लीगमध्ये ९.८७ सेकंद वेळ नोंदवून जेतेपद पटकावले होते.
फराह अनेक वादानंतर विश्व चॅम्पियनशिपसाठी दाखल झाला. त्याचे अमेरिकन कोच अल्बर्टो सालाझार यांच्यावर डोपिंगविरोधी नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता; पण फरहाने कोचला भक्कम पाठिंबा दिला. फराहपुढे इथिओपिया तसेच कॅनडाच्या धावपटूंचे कडवे आव्हान असेल. याशिवाय, गेल्या वर्षी सर्वांत वेगवान वेळेची नोंद करणारा अमेरिकेचा गालेन हादेखील प्रतिस्पिर्धी म्हणून रिंगणात आहे.
गालेनने गेल्या वर्षी सर्वांत जलद वेळ नोंदविली होती. पहिल्याच दिवशी पुरुष मॅरेथॉनचेदेखील आयोजन केले आहे. उकाड्यापासून बचावासाठी पहाटे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वांच्या नजरा असतील त्या युगांडाचा स्टीफन किपरोटीच याच्या कामगिरीकडे. लंडन आॅलिम्पिक तसेच मॉस्को विश्व चॅम्पियनशिपमध्ये किपरोटीचने सुवर्णपदक जिंकले होते. (वृत्तसंस्था)