विश्व बुद्धिबळ :सेतुरमणची आगेकूच, पोनोमारियोव्हला नमवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:29 AM2017-09-06T00:29:21+5:302017-09-06T00:29:29+5:30
ग्रॅण्डमास्टर व माजी आशियाई चॅम्पियन एस.पी. सेतुरमणने माजी फिडे चॅम्पियन युक्रेनच्या रुस्लान पोनोमारियोव्हचा पराभव करीत विश्वकप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक विजय नोंदवला.
टिबिलिसी (जॉर्जिया) : ग्रॅण्डमास्टर व माजी आशियाई चॅम्पियन एस.पी. सेतुरमणने माजी फिडे चॅम्पियन युक्रेनच्या रुस्लान पोनोमारियोव्हचा पराभव करीत विश्वकप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक विजय नोंदवला.
पहिला गेम बरोबरीत सोडविल्यानंतर सेतुरमणने आक्रमक खेळ करताना त्याच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या खेळाडूचा पराभव केला. या विजयासह सेतुरमण नॉकआऊट स्पर्धेच्या दुसºया फेरीत दाखल झाला.
पाचवेळा विश्व चॅम्पियन ठरलेल्या विश्वनाथन आनंदनेही दुसºया फेरीत स्थान मिळवले. त्याने मलेशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर ली तियान यिओचा पराभव केला. दुसºया गेममध्ये त्याच्याकडे एका गुणाची आघाडी होती, पण त्याने साधारण खेळ केल्यामुळे दडपण आले. यिओला संधीचा लाभ घेता आला नाही आणि आनंदने १.५-०.५ ने विजय मिळवला.
हरिकृष्णाने फिडे विश्वकपच्या पहिल्या फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून सावरताना दुसºया गेममध्ये ग्रॅण्डमास्टर युरी गोंजालेस विडालचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकावर असलेला हरिकृष्णा पांढºया सोंगट्यांसह खेळत होता. त्याने क्युबाच्या प्रतिस्पर्ध्याला चोख प्रत्युत्तर दिले. उभय खेळाडूंदरम्यान पहिल्या २० चालीपर्यंत लढतीत बरोबरी होती, पण त्यानंतर विडालने चूक केली आणि त्याच्यावर दडपण आले. हरिकृष्णाने ४१ चालींनंतर विजय मिळवला. आता टायब्रेकमध्ये खेळणार आहे. विदिती गुजरातीने पराग्वेचा एन. डेलगाडो रामिरेजचा १.५-०५ ने पराभव केला. युवा ग्रॅण्डमास्टर मुरली कार्तिकेयनने स्पेनच्या फ्रान्सिस्को वालेजो पोंसचा पराभव करीत टायब्रेकमध्ये स्थान मिळवले. तो आता बी. अधिबानसोबत टायब्रेक खेळेल. अधिबानने व्हिएतनामच्या एंगुयेन एंगोकविरुद्ध लढत बरोबरीत सोडवली. ग्रॅण्डमास्टर दीप सेनगुप्ता पहिल्या फेरीत गारद झालेला एकमेव भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याला चीनच्या वांगा हाओविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)