चॅम्पियन्सचा वर्ल्डकप - आॅस्टे्रलियाचा धडाका

By admin | Published: May 30, 2017 12:53 AM2017-05-30T00:53:25+5:302017-05-30T00:53:25+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे पाचवे सत्र भारतामध्ये आयोजिण्यात आले होते. २००२ मध्ये करमुक्तीच्या गोंधळामुळे भारतातील स्पर्धा

The World Cup for the Champions - The Aussies | चॅम्पियन्सचा वर्ल्डकप - आॅस्टे्रलियाचा धडाका

चॅम्पियन्सचा वर्ल्डकप - आॅस्टे्रलियाचा धडाका

Next

२००६ विजेता : आॅस्ट्रेलिया
चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे पाचवे सत्र भारतामध्ये आयोजिण्यात आले होते. २००२ मध्ये करमुक्तीच्या गोंधळामुळे भारतातील स्पर्धा श्रीलंकेमध्ये हलविण्यात आली होती. या वेळीही हाच गोंधळ कायम होता. परंतु, नंतर सरकारकडून करमुक्ती मिळाल्यानंतर अखेर ही स्पर्धा यशस्वीपणे भारतात पार पडली. या स्पर्धेवर वर्चस्व राखले ते बलाढ्य आॅस्टे्रलियाने. साखळी फेरीमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत झालेल्या कांगारूंनी अंतिम फेरीत त्याच वेस्ट इंडिज संघाचा धुव्वा उडवत दिमाखात विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, विंडीजचा विध्वंसक फलंदाज ख्रिस गेलने स्पर्धा गाजवताना मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत अनेक सामने कमी धावसंख्येचे झाले. आठ मुख्य संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. १५ ते २९ आॅक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेचे सामने मोहाली, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबई (ब्रेबॉर्न) येथे खेळविण्यात आले. ब्रेबॉर्न स्टेडियमवर ११ वर्षांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात येत असल्याने ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरली.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभही वादग्रस्त झाला. विजेत्या आॅस्टे्रलियाला बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला. परंतु, या वेळी कर्णधार रिकी पाँटिंगच्या संघाकडून पवार यांना धक्काबुक्की झाली. यावर मोठा वाद झाला. आॅस्टे्रलियन संघाकडून माफी मागण्यात यावी, अशी मागणी झाली. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही आॅस्टे्रलियन संघाच्या गैरवर्तणुकीचा समाचार घेतला. अखेर पाँटिंगने संघाच्या वतीने पवारांची माफी मागितल्यानंतर हा वाद निवळला.
यजमान भारताने या स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करून दमदार सलामी दिली. घरच्या मैदानावर भारत चमकदार कामगिरी करेल, अशी आशा होती. परंतु, वेस्ट इंडिज व ओस्टे्रलियाकडून झालेल्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले. आॅस्टे्रलियाने उपांत्य फेरीत
न्यूझीलंडला, तर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला नमवून अंतिम फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात विंडीजचा १३८ धावांमध्ये धुव्वा उडवल्यानंतर आॅस्टे्रलियाने २ बाद ११६ धावांची मजल मारून डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ८ विकेट्सने बाजी मारत विजेतेपद पटकावले.

२००९ विजेता : आॅस्ट्रेलिया
स्पर्धेचे हे सहावे सत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित झाले. गतविजेत्या आॅस्टे्रलियाने आपले विजेतेपद कायम राखण्यात यश मिळवताना सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकणारा आॅस्टे्रलिया संघ आतापर्यंतचा एकमेव संघ आहे. ही स्पर्धा काही कारणास्तव तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयोजिण्यात आली. २००६ मध्ये आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार ही स्पर्धा २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती. परंतु, तेथील सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून अनेक संघांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा निर्धारित वेळेत होऊ शकली नाही. त्यानंतर एका वर्षाने या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेने भूषविले.
२४ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेचे सामने जोहान्सबर्ग व सेंच्युरियन येथे झाले.
भारतासाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. पहिल्याच सामन्यात भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ५४ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर आॅस्टे्रलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीसाठी भारताला पुढील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मोठा विजय पाहिजे होता. तसेच, आॅस्टे्रलियाचा पाकिस्तानविरुद्ध पराभव आवश्यक होता. भारताने विंडीजविरुद्ध मोठा विजय मिळवला खरा, परंतु आॅस्टे्रलियाने पाकविरुद्ध बाजी मारल्याने भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले.
आॅस्टे्रलियाने उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडला ९ विकेट्सने लोळवले. दुसरीकडे
न्यूझीलंडने पाकिस्तानला ५ विकेट्सने नमवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आॅस्टे्रलियाने गोलंदाजीत चमक दाखवून किवींना मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर दमदार फलंदाजीच्या जोरावर ६ विकेट्सने विजेतेपद पटकावले. सलामीवीर शेन वॉटसनने तडाखेबंद नाबाद शतक ठोकत आॅसीला विजयी केले.
- रोहित नाईक -

Web Title: The World Cup for the Champions - The Aussies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.