विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’ आजपासून

By admin | Published: September 14, 2016 07:09 PM2016-09-14T19:09:11+5:302016-09-14T19:09:11+5:30

भारतात २०१७ मध्ये १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेची ‘रंगीत तालीम’ म्हणून १६ वर्षांखालील एएफसी स्पर्धेकडे पाहिले जात आहे

World Cup 'Colorful Training' | विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’ आजपासून

विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’ आजपासून

Next
>सचिन कोरडे / ऑनलाइन लोकमत
१६ वर्षांखालील एएफसी स्पर्धा गोव्यात : भारताचा यूएईविरुद्ध सामना 
पणजी, दि. 14 - भारतात २०१७ मध्ये १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेची ‘रंगीत तालीम’ म्हणून १६ वर्षांखालील एएफसी स्पर्धेकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेस गुरुवारपासून (दि.१५) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारत विरुद्ध यूएई या सामन्याने सुरुवात होईल. भारत आपले अभियान विजयासह सुरू करण्याचा प्रयत्न करेल. स्पर्धेसाठी पूर्ण तयारी झाली असून स्टेडियमही फिफाच्या मार्गदर्शक तत्त्वप्रणालीनुसार सज्ज झाले आहे.
 
२००२ मध्ये भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या कामगिरीत अधिक सुधारणा करीत घरच्या मैदानावर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा भारतीयांचा प्रयत्न असेल. भारत एआयएफएफ युथ चषकात अंतिम स्थानावर होता. भारतीय संघ गेल्या तीन महिन्यांपासून जर्मनी आणि नॉर्वे येथे सराव करीत होता. ज्यामध्ये त्यांनी १९ सामन्यांत १२ विजय नोंदवले होते. या प्रदर्शनावर भारतीय प्रशिक्षक निकोल अ‍ॅडम खुश असून ते या मोहिमेस मोठ्या विश्वासाने सुरुवात करणार आहेत. यासंदर्भात अ‍ॅडम म्हणाले, की आम्ही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. आता आम्हाला पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी पात्रता मिळवायची आहे. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न असेल. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचावा, असा आमचा पहिला प्रयत्न असेल. 
 
आम्हाला संयुक्त अरब अमिरात, इराण आणि सौदी अरेबिया यांच्यासोबत कठीण गट मिळाला आहे. मजबूत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळणे हे चांगलेच असते. मजबूत संघाविरुद्ध खेळल्याने आपली स्थिती काय आहे, याची सुद्धा कल्पना येते. त्यानुसार सुधारणा करता येतात. स्पर्धेत काही खेळाडूंची कमतरता नक्की भासेल. असे असले तरी आम्ही सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करू. 
आम्हाला पाच खेळाडूंची कमतरता भासेल. जे १७ वर्षांखालील विश्वचषकात खेळतील. आमचे लक्ष्य सेमीफायनल आहे. त्यानुसार गटात सर्वोत्तम प्रदर्शन आवश्यक आहे. यूएई हा मानांकनात भारतापेक्षा वर आहे. सातव्यांदा त्यांचा संघ ही स्पर्धा खेळत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्यांचे आव्हान नक्की असेल. 
 
असे आहेत गट...
‘अ’ गट- भारत, इराण, सौदी अरेबिया, यूएई. ‘ब’ गट- ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, किर्गिजस्तान. ‘क’ गट- कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, ओमान, इराक. ‘ड’ गट- डेमोके्रटिक कोरिया, उज्बेकिस्तान, थायलंड, येमेन. 
भारताच्या लढती : १) १५ सप्टेंबर- वि. यूएई, वेळ : संध्याकाळी ७ वा. २) १८ सप्टेंबर- वि. सौदी अरेबिया, वेळ : संध्या ७ वा. ३) २१ सप्टेंबर- वि. इराण, वेळ ७ वा. (सर्व सामने फातोर्डा स्टेडियम-मडगाव)
एएफसी चषकात भारत...
स्पर्धेत भारताने २००२मध्ये सर्वाेत्तम कामगिरी करीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. स्पर्धेत प्रवेश करणारा हा सातवा संघ आहे. २०१४ मध्ये कुवेत आणि ताजिकिस्ताननंतर भारत अखेरच्या स्थानी राहिला होता. आता यजमान असल्याने भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 
 
चाहत्यांसाठी मोफत तिकीटे 
एएफसी फुटबॉल चषकातील सामने चाहत्यांना मोफत पाहता येणार आहे. स्थानिक आयोजक समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेत एकूण १६ देशांतील संघ सहभागी होत आहेत. सामन्यसाठी चाहत्यांना  संकेतस्थळावरून नावनोंदणी करून तिकिटे मिळवावी लागतील. ही तिकिटे स्टेडिमय काउंटरवर मोफत असतील.
 

Web Title: World Cup 'Colorful Training'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.