विश्वचषक नेमबाजी : अखिल शेरॉनचे सुवर्ण यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:49 AM2018-03-12T01:49:47+5:302018-03-12T01:49:47+5:30
मॅक्सिको येथील गुआदालाजारा येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारताची सुवर्ण कामगिरी कायम असून रविवारी युवा नेमबाज अखिल शेरॉन याने भारतासाठी सुवर्ण वेध साधला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये वर्चस्व राखताना अखिलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
नवी दिल्ली - मॅक्सिको येथील गुआदालाजारा येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारताची सुवर्ण कामगिरी कायम असून रविवारी युवा नेमबाज अखिल शेरॉन याने भारतासाठी सुवर्ण वेध साधला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये वर्चस्व राखताना अखिलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यासह अखिल विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणात सुवर्ण पदक पटकावणारा चौथा भारतीय नेमबाज ठरला.
या आधी शहजर रिझवी, मनू भाकर, मेहुली घोष व अंजुम मुदगिल यांनी गेल्या आठवड्यात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. या शानदार कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच भारत आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या अखेरपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिल हे जवळपास निश्चित झाले आहे.
अंतिम फेरीत अखिलने ४५५.६ गुणांचा वेध घेत बाजी मारली. त्याने आॅस्ट्रियाच्या बर्नार्ड पिकल याला मागे टाकले. पिकलने ४५२ गुणांसह रौप्य पदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे या स्पर्धेत ३८ वेळचा आयएसएसएफ पदकविजेता आणि हंगेरीचा महाना रायफल नेमबाज पीटर सिडी, आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता फ्रान्सचा अॅलेक्सिस रेनाल्ड, एअर रायफल सुवर्ण विजेता हंगेरीचा इस्तवान पेनी तसेच भारताचा थ्री पोजिशन चॅम्पियन संजीव राजपूत अशा मातब्बर नेमबाजांचाही सहभाग होता. मात्र याचे कोणतेही दडपण न घेता युवा अखिलने जबरदस्त एकाग्रता राखताना सर्वांना मागे टाकले. (वृत्तसंस्था)
अंतिम फेरीत अखिलचे वर्चस्व
अंतिम फेरी पात्रतेसाठी प्रत्येक नेमबाजाला प्रत्येक पोजिशनमध्ये ४० नेम साधायचे होते. भारताचा अनुभवी नेमबाज संजीवने १२०० पैकी ११७६ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले.
हंगेरीच्या इस्तवान पेनीने ११७८ गुणांसह अग्रस्थान राखले. त्याचवेळी अखिल मात्र ११७४ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला होता. तसेच, अन्य युवा नेमबाज स्वप्नील कुसाल याने ११६८ गुणांसह सातवे स्थान मिळवले.
यासह अंतिम फेरीत आठ नेमबाजांपैकी
३ नेमबाज भारतीय होते. अंतिम फेरीत अखिलने अप्रतिम सातत्य राखताना पात्रता फेरीतील सर्व कसर भरुन काढताना आपली सर्वोत्तम कामगिरी केली.
महिलांमध्ये आणखी संधी
मनू भाकरने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये ५८१ गुणांसह चौथे स्थान पटकावून अंतिम फेरीत धडक मारली. अनू राज सिंगला ५७५ गुणांसह दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.
त्याचप्रमाणे विद्यमान आॅलिम्पिक विजेती अॅन्ना कोराकाकी आणि रिओ आॅलिम्पिक कांस्य विजेती हेदी गर्बर यांनीही अपेक्षित कामगिरीसह अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
बिंद्राने केले कौतुक....
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारतीयांची सुवर्ण कामगिरी पाहून अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला असून भारताचा महान नेमबाज आणि एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. ‘भारतीय नेमबाजी सुरक्षित हातांमध्ये असून विद्यमान नेमबाजांमध्ये आॅलिम्पिक चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे,’ असा विश्वास बिंद्राने व्यक्त केला आहे.
बिंद्राने ट्वीट केले की, ‘मॅक्सिको विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारतीयांची कामगिरी म्हणजे भारतीय नेमबाजीच्या नव्या युगाची सुरुवात आहे. भारताचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये असून मला विश्वास आहे की या युवा नेमबाजांमध्ये आॅलिम्पिक पोडियमवर अव्वलस्थानी पोहचण्याची क्षमता आहे. सर्वांचे अभिनंदन.’