विश्वचषक नेमबाजी : ज्युनिअर नेमबाजांचा गोल्डन धमाका; हृदय हजारिका, महिला संघाचे सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 02:15 AM2018-09-08T02:15:34+5:302018-09-08T02:15:58+5:30
चांगवोन : भारतीय नेमबाज हृदय हजारिकाने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये ज्युनिअर १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. महिला संघाने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. इलोवेनील वारारिवानने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदकाची कमाई केली. फायनलमध्ये तिला विश्वकपमध्ये दोन सुवर्णपदक पटकावणारी चीनची नेमबाज शी मेंगयोकडून पराभव स्वीकारावा लागला. इलोवेनीलने २४९.८ अंक नोंदवले तर शी मेंगयोने २५०.५ अंकांची नोंद केली. १७ वर्षीय श्रेया अग्रवालले फायनलमध्ये २२८.४ अंकांसह कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेच्या ५२ व्या टप्प्यात सहाव्या दिवशी चार पोडियम स्थान मिळवल्यामुळे भारताची पदकांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. आयएसएसएफ प्रीमिअर स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी सहा पदकापर्यंत निर्धारित होती. क्रोएशियाच्या जगरेबमध्ये ४९ व्या टप्प्यात भारताने ही कामगिरी केली होती.
अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय हजारिकाने ६२७.३ चा स्कोअर केला. फायनलमध्ये हजारिका व इराणचा मोहम्मद आमिर नेकुनाम यांचे समान २५०.१ असे समान गुण होते.
हजारिकाने शूटआॅफमध्ये निर्णायक कामगिरी करताना विजय नोंदवला. रशियाच्या ग्रिगोरी सामाकोव्ह याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे, भारतीय संघ १८७२.३ गुणांसह
चौथ्या स्थानी राहिला. त्यात हजारिका, दिव्यांश पवार आणि अर्जुन बाबुटा यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)
ज्युनिअर महिला संघाचे वर्चस्व
भारतीय महिला १० मीटर एअर रायफल संघाने १८८०.७ च्या स्कोअरसह विश्वविक्रम नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय संघातर्फे इलावेनील वालारिवान (६३१), श्रेया अग्रवाल (६२८.५) आणि मानिनी कौशिक (६२१.५) यांनी चांगली कामगिरी केली.