‘वर्ल्ड कप’ पराभवाचा वचपा काढणार !

By Admin | Published: August 27, 2016 06:20 AM2016-08-27T06:20:42+5:302016-08-27T06:20:42+5:30

कसोटी मालिकेत २-० ने नमविणाऱ्या टीम इंडियाला अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात दोन टी-२० सामने खेळायचे आहेत.

World Cup will be defeated! | ‘वर्ल्ड कप’ पराभवाचा वचपा काढणार !

‘वर्ल्ड कप’ पराभवाचा वचपा काढणार !

googlenewsNext


फ्लोरिडा : वेस्ट इंडीजला त्यांच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-० ने नमविणाऱ्या टीम इंडियाला अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात दोन टी-२० सामने खेळायचे आहेत. आज, शनिवारी होणाऱ्या पहिल्या लढतीत विजय नोंदवित विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताला असेल.
शनिवार आणि रविवारी फ्लोरिडात दोन सामन्यांची मालिका होत असून दोन्ही संघांमधील रेकॉर्डवर नजर टाकल्यास आकडेवारीत विंडीजला झुकते माप आहे. दुसरीकडे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ विजयी रथावर स्वार झालेला दिसतो. दोन्ही संघांत पाच टी-२० सामने झाले. त्यातील तीन विंडीजने तर २ भारताने जिंकले आहेत.
यंदा भारतात झालेल्या विश्वचषकात विंडीजकडून मुंबईत भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया जखमी वाघाप्रमाणे तुटून पडणार आहे. भारताकडे दिग्गज खेळाडूंची उणीव नाही. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास देखील उंचावला. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे खेळाडू झटपट प्रकारातही उपयुक्त ठरू शकतात. भारताने अलीकडे आॅस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध टी-२० त देखणी कामगिरी केली आहे. १४ सदस्यांच्या भारतीय संघात झालेला सर्वांत मोठा बदल म्हणजे कर्णधार बदलणे हा आहे. त्यामुळे विंडीजकडून विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड यानिमित्ताने भारत करणार आहे.
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. यामुळे भारताला व्यापक पाठिंबा मिळेल. दुसरीकडे चांगल्या कामगिरीचेही दडपण राहणार आहे. धोनी आव्हान समर्थपणे पेलतो, पण गेल्या काही महिन्यांपासून तो मैदानाबाहेर होता, हे देखील नाकारता येणार नाही.
विंडीजला विश्वविजेता बनविणाऱ्या डेरेन सॅमीची चक्क संघातून हकालपट्टी करण्यात आली. दुसरीकडे सलग चार षट्कार खेचून जेतेपद मिळवून देणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. संघात ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नारायण, कीरोन पोलार्ड, लेंडल सिमन्स आणि आंद्रे रसेल या दिग्गजांचा समावेश आहे. कॅरेबियन संघाने या मालिकेत भारताचा सफाया केल्यास भारतीय संघ आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरेल. मालिका विजय किंवा बरोबरीमुळे मात्र भारत दुसऱ्या स्थानावरच कायम असेल. (वृत्तसंस्था)
क्रिकेटसाठी अमेरिका ‘विशेष’ मार्केट : धोनी
क्रिकेटसाठी अमेरिकन जमीन स्पेशल मार्केट असून येथे हा खेळ नक्की यशस्वी होईल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले.
अमेरिकन भूमीवर पहिल्यांदाच होत असलेल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पूर्वंसंध्येला बोलताना धोनी म्हणाला, मैदान थोडे छोटे आहे, परंतु त्याने फारसा फरक पडत नाही. कारण येथे मिळणाऱ्या सोई सुविधा जगातील इतर स्टेडीयम इतक्याच चांगल्या आहेत. काही आंतरराष्ट्रीय संघांचे सामने येथे झाले आहेत, शिवाय येथे काही लीग सामने सुध्दा झाले आहेत.
भारतीय संघासोबत पहिल्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर आल्याचे सांगून धोनी म्हणाला, येथे भारतीय आणि आशियाई वंशाचे खूप लोक राहतात. सामन्याची वेळही सर्वांंंंच्या सोईची आहे. एकूणच ही एक चांगली सुरवात आहे. येथे येवून मला चांगले वाटले
>सीनिअर्सकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा : सिमन्स
टी-२० क्रिकेटमध्ये सीनिअर्स खेळाडूंचे संघातील पुनरागमन शानदार असून भारताविरुद्ध शनिवारपासून खेळल्या जाणाऱ्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे, असे वेस्ट इंडिज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी म्हटले आहे.
भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वेस्ट इंडिज संघ फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. विंडीज टी-२० संघात दिग्गज ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि किरोन पोलार्ड यांच्यासारख्या टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश आहे. या व्यतिरिक्त डॅरेन सॅमीच्या स्थानी कार्लोस ब्रेथवेटकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
सिमन्स म्हणाले, ‘सीनिअर्स खेळाडूंचे संघातील पुनरागमन शानदार आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्वकाही सोपे होणार आहे. कारण या सर्व खेळाडूंना टी-२० क्रिकेटची चांगली माहिती आहे. आता त्यांना नैसर्गिक खेळ करताना बघण्याची संधी मिळणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविजेते असल्याचा संघाला लाभ मिळेल. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला राहील.’
>मैदानामुळे कुंबळे प्रभावित !
टीम इंडियाचे कोच अनिल कुंबळे यांनी टी-२० सामन्यांसाठी सज्ज असलेल्या मैदानाची आणि खेळपट्टीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी खेळपट्टी पाहिल्यानंतर टी-२० साठी ही आदर्श खेळपट्टी असल्याचे म्हटले. मैदान आणि आऊटफिल्ड पाहून ते फार प्रभावित झाले. आम्ही सर्वजण व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे अशा मैदानांवर खेळताना मजा येते. यामुळे अमेरिकेत क्रिकेट आणखी रुजेल, अशी आशा कुंबळे यांनी व्यक्त केली.
>संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, लोकेश राहुल, उमेश यादव, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.
वेस्ड इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), क्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, इविन लुईस, जेसन होल्डर, जॉनसन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, आंद्रे रसेल, केरॉन पोलार्ड, लेंडल सिमन्स, मार्लन सॅम्युअल्स, सॅम्युअल बद्री व सुनील नरेन.

Web Title: World Cup will be defeated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.