विश्वचषकविजेत्या दृष्टिहीन क्रिकेट संघाला दहा लाख
By admin | Published: February 21, 2017 12:33 AM2017-02-21T00:33:19+5:302017-02-21T00:33:19+5:30
पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवून टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाला दहा लाखांचा रोख पुरस्कार
नवी दिल्ली : पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवून टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाला दहा लाखांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली. दृष्टिहीन क्रिकेट संघटनेला मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अंतिम सामना जिंकला होता. याविषयी बोलताना गोयल म्हणाले, ‘‘भारताने संपूर्ण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून जगात अपराजित असल्याचे या संघाने सिद्ध केले आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये देशाने चार पदके जिंकली. आता दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकल्यामुळे देशातील दिव्यांग खेळाडू किती प्रतिभावान आहेत, याचा प्रत्यय येतो. या खेळाडूंना प्रोत्साहन आणि मदत मिळण्याची गरज आहे.’’(वृत्तसंस्था)