विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध - मुदगल समिती
By admin | Published: November 4, 2014 09:45 AM2014-11-04T09:45:25+5:302014-11-04T09:45:37+5:30
विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणा-यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचे नाव अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणा-या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हे आहेत.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुदगल समितीची नेमणूक केली होती. या समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर लिफाफ्यात अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात समितीने विश्वचषक विजेत्या संघातील एका भारतीय खेळाडूचे बुकींशी संबंध असल्याचे म्हटले आहे. हा खेळाडू आता भारतीय संघाचा भाग नाही. तीन वर्षांपूर्वी एका फसलेल्याा 'फिक्सिंग'चा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय बेटिंगप्रकरणात गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेता बिंदू दारा सिंह यांच्यामधील संभाषणातील आवाजही त्यांचेच असल्याचे स्पष्ट झाल्याने मयप्पन आणि त्यांचे सासरे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. .
अहवाल तयार करताना चौकशी समितीने चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडूंची चौकशी करुन मयप्पन, एन. श्रीनिवासन यांचा संघातील हस्तक्षेपाविषयी माहिती जाणून घेतली. या अहवालातील गोपनीयता उघड होऊ नये म्हणून समितीने खेळाडूंचे नाव जाहीर करण्याऐवजी त्यांना विशिष्ट क्रमांक दिला आहे. तर खेळाडूंना दिलेल्या विशिष्ट क्रमांकाची यादी संबंधीत न्यायाधीशांनाच दिली जाणार आहे.