जागतिक ज्यु. बुद्धिबळ : ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे बरोबरीवर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:21 AM2019-10-05T04:21:42+5:302019-10-05T04:24:48+5:30
अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्टुर डवत्यान याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना भारताचा दुसरा मानांकीत आणि संभाव्य विजेता मानला जात असलेला ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले.
मुंबई : अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्टुर डवत्यान याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना भारताचा दुसरा मानांकीत आणि संभाव्य विजेता मानला जात असलेला ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले. तब्बल ९९ चालींपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्या लढतीत प्रज्ञानंदने बरोबरी मान्य केली. अन्य लढतीत स्पर्धेतील अव्वल मानांकीत अर्मेनियाच्याच ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान यालाही बरोबरीवर समाधान मानावे लागले.
अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या यजमानपदाखाली आणि अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व ‘फिडे’ यांच्या वतीने पवई येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी डवत्यानने लक्ष वेधले. १८ वर्षांखालील गटाच्या या लढतीत त्याने गँबीट ओपनिंगसह डावाची सुरुवात करताना प्रज्ञानंदला चांगलेच दडपणाखाली आणले. तब्बल ९९ चालींपर्यंत खेळ रंगल्यानंतर प्रज्ञानंदने बरोबरी मान्य केल्याने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण वाटून देण्यात आला. दुसरीकडे, अव्वल मानांकीत सर्गस्यान यानेही बरोबरी मान्य केल्याने दोघांना स्पर्धेच्या गुणतालिकेअ २.५ गुणांसह द्वितीय स्थानी यावे लागले.
त्याचवेळी, अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर घोलमी आर्यन, भारताचा ग्रँडमास्टर इनियान पी., जॉर्जियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर पी. निकोलोझ यांनी प्रत्येकी ३ गुणांसह आगेकूच करताना संयुक्तपणे अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. शुक्रवारी पहिल्या बोर्डवर झालेल्या सामन्यात भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर आदित्य मित्तलने सर्वांचे लक्ष वेधताना अव्वल खेळाडू सर्गस्यान याला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. सिसिलियन बचावाने सुरुवात झालेल्या या लढतीत एकूण ६७ चाली रचल्या गेल्या. भक्कम बचावाचे प्रदर्शन केलेल्या आदित्यपुढे निभाव लागत नसल्याचे पाहून अखेर सर्गस्यान याने बरोबरी मान्य केली.
मुलींच्या १६ वर्षांखालील गटात भारताच्या सी. लक्ष्मीने धक्कादायक निकाल लावला. तिने सफेद मोहऱ्यांसह खेळताना आपल्याहून २४१ गुणांनी सरस रेटिंग असलेल्या सर्बियाच्या जोवाना सरदानोविकाला नमविले. सिसिलियन तैमानोव बचावाने सुरुवात केल्यानंतर म्आक्रमक पवित्रा घेतलेल्या लक्ष्मीने ४३ चालींमध्येच बाजी मारली. यासह तिने एकूण ३ गुणांची कमाई करत संयुक्तपणे अग्रस्थान कायम राखले.
१४ वर्षांखालील खुल्या वयोगटामध्ये अग्रमानांकीत भारताच्या श्रीश्वान एम. याने अपेक्षित कामगिरी करताना भारताच्याच निखिल एम. याचा पराभव केला. यासह त्याने ३ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. दुसºया बोर्डवर १७व्या मानांकीत अमेरिकेच्या अॅलेक्स कोलाय याने अनपेक्षित निकाल नोंदवत रशियाचा द्वितीय मानांकीत फिडे मास्टर वोलोदार मुर्झिन याचा पराभव केला. किंग्स इंडियन बचावपद्धतीने सुरुवात केल्यानंत्र मुर्झिनने डावाच्या मधल्या वेळेत काही चुका केल्या. याचा फायदा घेत कोलायने वर्चस्व मिळवले.