भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक संघटनेने केली बंदीची कारवाई; आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपदही भारताने गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:31 AM2018-09-05T01:31:47+5:302018-09-05T01:32:47+5:30
दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दखल घेण्याची बाब म्हणजे, एएआयने दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने आणि याविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणती हमी न मिळाल्याने जागतिक तिरंदाजी आशिया संघटनेने (डब्ल्यूएए) टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून काढून घेतले आहे. यामुळे आता आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद थायलंडला बहाल करण्यात आले.
शिवाय या प्रकरणाचा सगळा अहवालही ‘डब्ल्यूएए’ने जागतिक तिरंदाजी संघटनेकडे सोपविला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय ‘डब्ल्यूएए’च्या कार्यकारिणी बैठकीत झाला आणि या बैठकीमध्ये ‘एएआय’चा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
‘एएआय’च्या न झालेल्या निवडणूकीमुळे जागतिक तिरंदाजी संघटना नाराज आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘एएआय’ला २६ जुलैला पाठविलेल्या पत्रामध्ये आशियाई अजिंक्यपद आणि संघटनेच्या निवडणूकीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. (वृत्तसंस्था)
‘एएआय’ला पाठविण्यात आलेल्या पत्रात असेही म्हटले होते की, समाधानकारक उत्तर न दिल्यास आणि निवडणूक प्रक्रीया न केल्यास केवळ ‘एएआय’लाच नाही, तर भारताच्या खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागापासून रोखण्यात येईल. हे पत्र बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेले माजी सरचिटणीस अनिल कामिनेनी यांना लिहिले गेले होते. हे पत्र कामिनेनी यांनी सर्वोच्च न्यायालयद्वारे नेमण्यात आलेले प्रशासक एस. वाय. कुरेशी यांना सोपविले होते.
यावर सूत्रांनी माहिती दिली की, कुरेशी यांनी याबाबत जागतिक संघटनेला भारतीय संघटनेच्या सर्व वस्तुस्थितीची माहिती दिली होती, तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाबाबतही भरवसा दिला होता. मात्र, जागतिक संघटना कुरेशी यांच्या उत्तरावर समाधानी नव्हते. त्याच बरोबर या स्पर्धेच्या आयोजनाविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणत्याही प्रकारची हमी देण्यात आली नाही. दरम्यान ‘जागतिक संघटनेकडून अहवालाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.