विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : भारताची निराशाजनक कामगिरी, रिकाम्या हाताने भारतीय मल्ल परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:40 PM2017-08-26T23:40:41+5:302017-08-26T23:41:10+5:30
बजरंग पुनिया विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवशी पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रेपचेज फेरीत पराभूत झाला. त्यामुळे भारताने या स्पर्धेतील आपली मोहीम पदकाविना निराशाजनकरीतीने समाप्त केली.
पॅरिस : बजरंग पुनिया विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवशी पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रेपचेज फेरीत पराभूत झाला. त्यामुळे भारताने या स्पर्धेतील आपली मोहीम पदकाविना निराशाजनकरीतीने समाप्त केली. मनोरंजक बाब म्हणजे सलग दुसºया विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मल्ल रिकाम्या हाताने परतले आहेत.
गेल्या वर्षी बुडापेस्टमध्ये आधीच्या स्पर्धेतही भारत एकही पदक जिंकू शकला नव्हता. आज अखेरच्या १६ मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर बजरंगच्या जवळ कास्यपदकासाठी प्लेआॅफमध्ये विजयाची संधी होती; परंतु तो संधीचे सोने करू शकला नाही. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत चॅम्पियन बनलेल्या बजरंगकडून खूप अपेक्षा होत्या; परंतु तो तुर्कीचा प्रतिस्पर्धी मुस्तफा काया विरुद्ध रेपचेज लढतीत विजय मिळवू शकला नाही आणि तो ३-८ असा पराभूत झाला.
भारताच्या २४ सदस्यीय पथकातील एकही जण पदक जिंकू शकला नाही, कारण सर्वच जण आपापल्या वजन गटात सुरुवातीच्या फेरीतच पराभूत झाले. मुख्य फेरीत एकही पैलवान सलग दोन लढती जिंकू शकला नाही. एवढेच नव्हे, तर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या शानदार कामगिरीनंतर भारतीय मल्ल रेपचेजमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरले; परंतु ते संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत.
आज शर्यतीत समाविष्ट असणाºया चार भारतीयांपैकी तीन जणांनी आपली क्वालिफिकेशन फेरी पार केली; परंतु फक्त अमित धनकड (७० किलो) अपयशी ठरला. तो कजाखस्तानच्या अकजुरेक तानातारोव्हकडून २-९ असा पराभूत झाला. बजरंग, प्रवीण राणा (७४ किलो) आणि सत्यव्रत कादिया (९७ किलो) यांनी आपली क्वालिफिकेशन लढत जिंकत चांगली सुरुवात केली; परंतु हे सर्वच उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले. बजरंगला जॉर्जियाच्या जुरी लाकोबिशविली याच्याकडून ५-६, राणाला अजरबेजानच्या जाब्रायिल हासानोव याच्याकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. अर्मेनियाच्या जॉर्जी केतोयेवने कादिया याला ५-० असे नमवले; परंतु बजरंगला त्याचा जॉर्जियाचा प्रतिस्पर्धी ६५ किलो वजन गटात अंतिम फेरीत पोहोचल्याने त्याला रेपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती; परंतु तो अपयशी ठरला.