विश्व युवा महिला बॉक्सिंगचा थरार आजपासून; ४४ देशांतील २०० दिग्गज बॉक्सर्स रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:42 AM2017-11-19T02:42:10+5:302017-11-19T02:42:20+5:30
शक्ती आणि युक्तीचा खेळ असलेल्या बॉक्सिंग रिंकमध्ये वर्चस्व गाजविण्यासाठी ४४ देशांतील २०० युवा महिला बॉक्सर्सची आसामच्या राजधानीत रविवारपासून मांदियाळी लागत आहे. निमित्त आहे, पहिल्या जागतिक महिला युवा बॉक्सिंग स्पर्धेचे.
- किशोर बागडे
(थेट गुवाहाटी येथून...)
गुवाहाटी : शक्ती आणि युक्तीचा खेळ असलेल्या बॉक्सिंग रिंकमध्ये वर्चस्व गाजविण्यासाठी ४४ देशांतील २०० युवा महिला बॉक्सर्सची आसामच्या राजधानीत रविवारपासून मांदियाळी लागत आहे. निमित्त आहे, पहिल्या जागतिक महिला युवा बॉक्सिंग स्पर्धेचे. विश्व बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) पहिल्याच आयोजनाची माळ भारताच्या गळ्यात टाकली, हे विशेष. एआयबीए विश्व ज्युनियर चॅम्पियन असलेल्या सहा खेळाडूंचा खेळ अगदी जवळून पाहण्याची संधी भारतीयांना मिळेल.
१९ ते २६ नोव्हेंबरपर्यंत रंगणारा बॉक्सिंगचा थरार अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पूर्वेकडील बंगाल, बिहार, लक्षद्वीप आणि त्रिपुरातील क्रीडारसिक उत्सुक आहेत. भारतीय संघातील युवा स्टार बॉक्सर्स यजमान या नात्याने नशीब आजमावणार असून यापैकी काहींना निश्चित पदके मिळतील, अशी आशा वर्तविण्यात येत आहे. यानिमित्ताने पूर्वेकडील पर्यटनाला
जागतिकस्तरावर नवी ओळख देण्याचा आसाम सरकारचा मनोदय असल्यामुळे विमानतळापासून शहरात सर्वत्र खेळाडूंशिवाय पूर्व भारतातील पर्यटनाची माहिती देणारे फलक लागलेले दिसतात.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अर्थमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्या पुढाकारामुळे साकार झालेले हे आयोजन भव्यदिव्य व्हावे, यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धास्थळ, खेळाडूंची निवासव्यवस्था आणि सरावस्थळ सुसज्ज करण्यात आले असून यानिमित्ताने भारतीय
बॉक्सर्सना आंतरराष्टÑीय भरारी
घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक देशाच्या युवा महिला खेळाडू सराव रिंकमध्ये घाम गाळत असून सराव पाहण्यासाठीही स्थानिकांची गर्दी उसळत आहे.
उद्घाटनाला क्रीडामंत्री, बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सायंकाळी ६.३० वाजल्यापासून होईल. केंद्रीय क्रीडामंत्री आणि आॅलिम्पिक नेमबाजीचे रौप्य पदकविजेते राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या उपस्थितीत होणार असून, मुख्यमंत्री सोनोवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे थिम साँग गाणारा गायक शान आणि स्थानिक चित्रपटसृष्टीतील सिनेकलावंत उपस्थितांचे मनोरंजन करतील. स्पर्धेची ब्रॅण्डदूत असलेली पाचवेळेची आॅलिम्पिक चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम ही मात्र उपस्थित राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव आशियाई स्पर्धेचे सुवर्ण जिंकणारी मेरी कोम येणार नसली, तरी नंतर सर्व दिवस तिची उपस्थिती राहील, असे आयोजकांनी सांगितले.
- स्पर्धेत सर्वाेत्कृष्ट कामगिरी करण्याकडे भारताच्या नजरा असतील. भारताला पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. २०११ नंतर प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याची संधी भारताकडे असेल. भारताचा दहा सदस्यीय संघ स्थानिक वातावरणाचा कितपत फायदा उठवते याकडेही लक्ष असेल. चीन, रशिया, कझागिस्तान, फ्रान्स, इंग्लंड आणि युक्रेन या देशातील खेळाडूंचे आव्हान असेल.
विश्व युवा बॉक्सिंग
स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
एआयबीए युवा महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारताने दहा सदस्यीय संघाची घोषणा केली. यात स्थानिक प्रतिभावंत बॉक्सर अंकुशिता बोरो (६४ किलो) हिचा समावेश आहे. हरियानाच्या सहा खेळाडूंना संघात स्थान मिळाले असून, त्यात नीतू (४८ किलो), ज्योती (५१), साक्षी चौधरी (५४), शशी चोप्रा, (५७), अनुपमा (८१) व नेहा यादव (८१) यांचा समावेश आहे. मिझोरमची वानलालरियापुली (६० किलो), उत्तर प्रदेशची आस्था पाहवा (६९ किलो), आंध्रची निहारिका गोनेला (७५ किलो)
यांना संघात स्थान मिळाले.
आॅनलाइन तिकिटे संपली...
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आॅनलाइन तिकीटविक्री करण्यात आली. १५० ते ५०० रुपये दर असलेली सर्व तिकिटे संपली आहेत.
हा चांगला संघ असून, प्रत्येक बॉक्सर पदक जिंकण्याची जिद्द बाळगतो. बोरोने अलीकडे बल्गेरिया आणि इस्तंबूल येथे युवा आंतरराष्टÑीय स्पर्धेत पदके जिंकल्याने तिच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. भारतीय संघ गुवाहाटी येथे अन्य आंतरराष्टÑीय संघांसोबत सराव करीत आहे.
- राफेल बोर्गामास्को, भारतीय कोच