‘वरळी ते ठाणे’.. व्हाया बॅडमिंटन

By admin | Published: March 30, 2017 07:12 AM2017-03-30T07:12:48+5:302017-03-30T07:12:48+5:30

आठ वर्षांपूर्वी १२ वर्षांचा मुलगा आपल्या बाबांच्या दुचाकीवरून वरळी ते ठाणे असा प्रवास करत होता.

'Worli to Thane' .. Vayya Badminton | ‘वरळी ते ठाणे’.. व्हाया बॅडमिंटन

‘वरळी ते ठाणे’.. व्हाया बॅडमिंटन

Next

आठ वर्षांपूर्वी १२ वर्षांचा मुलगा आपल्या बाबांच्या दुचाकीवरून वरळी ते ठाणे असा प्रवास करत होता. बॅडमिंटन शिकण्यासाठी ‘त्या’ मुलाचा हट्ट पाहून वडिलांनीही त्याला नकार दिला नाही. ठाण्यातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत वाड यांची भेट घेऊन त्या मुलाने ठाणे बॅडमिंटन अकादमीत सराव करण्यास सुरुवात केली. याच काळात सुट्टीच्या दिवशी आईसह ट्रेनमध्ये बॅडमिंटन खेळावरील चित्रफीत पाहत असताना त्याचा प्रवास सुखकर होत होता; आणि आता हाच तो मुलगा वयाच्या २०व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी विजेतेपद मिळवणारा पहिला मुंबईकर ठरला आहे.


क्रिकेटवेड्या देशात शटलर्स का व्हावेसे वाटले?
- क्रिकेटवेड्या शहरात प्रत्येक जण क्रिकेटपटू बनण्याचा प्रयत्न करतो. मात्र सुरुवातीपासूनच मला शटलर्स व्हायचे होते. योग्यवेळी वाड सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि खेळाला सुरुवात झाली. यामुळे मी विविध स्पर्धेत यशस्वी होत गेलो. राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी विजेतेपद मिळवणे हे स्वप्न होते मात्र ‘आॅलिम्पिक की मंझिल अभी बाकी है...
मेहनतीविषयी काय सांगशील?
- ‘अपयश ही यशाची पहिली पायरी...’ याचा प्रत्यय मलादेखील आला. कारकिर्दीतील मनोरा बॅडमिंटन या पहिल्याच स्पर्धेत मला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र हे अपयश ‘पहिले आणि शेवटचे’ या जिद्दीने कोर्टावर मी पुन्हा घाम गाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. एक-दोन नव्हे, तर तब्बल १५ जिल्हास्तरीय एकेरी स्पर्धेत विजेतेपद मिळवणे शक्य झाले. मेहनत करण्याची तयारी, जिद्द आणि स्पर्धेत खेळताना सर्वस्व झोकून
देण्याची तयारी आणि आपल्या प्रशिक्षकांवर विश्वास असल्यास यश नक्की मिळते.
एकेरी स्पर्धा ते दुहेरी स्पर्धेचा प्रवास कसा होता?
- एकेरी स्पर्धेत वर्चस्व मिळवल्यानंतर वाड सरांच्या सल्ल्यानुसार मी दुहेरी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. १७ वर्षांखालील राज्यस्तरीय दुहेरी स्पर्धेसाठी डी. कौशल मला जोडीदार लाभला. आम्ही आक्रमक व बचाव यांचे उत्तम मिश्रण, संतुलित फटकेबाजी आणि खेळताना सहकाऱ्याबाबत समंजसपणा दाखवत स्पर्धेचे जेतेपद उंचावले. स्पर्धेतील विजयश्री मला पुढे खेळण्यास पाठबळ ठरली. त्यानंतर कबीर कंझारकरसह १९ वर्षांखालील राज्य स्पर्धा असो वा कौशलसह जयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धा. सर्व दुहेरी स्पर्धेत अपेक्षित यशाची घोडदौड राखण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आंध्र प्रदेश येथील अखिल भारतीय ज्युनियर स्पर्धा, मुंबई, पटना येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील दुहेरी प्रकारात छाप पाडण्यास मी यशस्वी ठरलो.
सिनियर गटात खेळताना कोणती आव्हाने आली?
- ज्युनियर यशानंतर माझ्यासमोर सीनियर गटात कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान होते. सिनियर दुहेरी स्पर्धेसाठी माझा ठाणे बॅडमिंटन अकादमीतील सहकारी अक्षय देवळकरची खूप मोठी मदत झाली. दुहेरी स्पर्धेत प्रतिस्पर्धींच्या हालचालीसह आपल्या सहकाऱ्याबाबतही सतर्क राहण्याचे आव्हान असते, परिणामी दुहेरीत जास्त जबाबदारी असते, हे माहीत होते. त्यादृष्टीने प्रशिक्षक आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने अहोरात्र कोर्टावर मेहनत करण्यास सुरुवात केली.
कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ?
- २०१६ वर्ष माझ्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट होते. पहिल्याच प्रयत्नात विजयवाडा येथील स्पर्धा फत्ते केली. कोलकात्यात स्पर्धेतील आक्रमकता पाहून माझी हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड करण्यात आली. देशांतर्गत विजय मिळवल्यानंतर विदेशातही कामगिरीत सातत्य राखल्याने त्याचा फायदा झाला.भविष्यात खेळाडू म्हणूनच करिअर करणार का?
- उत्तर प्रदेश, बरेली येथील राष्ट्रीय स्पर्धा आणि दिल्लीतील सुपर सिरीजमध्ये विजय मिळवण्याचे माझे लक्ष आहे. तसेच खेळाव्यतिरिक्त भविष्यात आयपीएय आॅफिसर बनण्याची इच्छा आहे.

विघ्नेशच्या विदेशी कारकिर्दीवर नजर
रौप्यपदक, पुरुष दुहेरी, आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धा (बहरीन)
रौप्यपदक, मिश्र दुहेरी, आंतरराष्ट्रीय सीरीज स्पर्धा (पोलंड)
रौप्यपदक, पुरुष दुहेरी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा (हैदराबाद)
रौप्यपदक, मिश्र दुहेरी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा (मुंबई )
दुहेरी सुवर्ण, पुरुष आणि मिश्र, राष्ट्रीय वरिष्ठ मानांकित बॅडमिंटन स्पर्धा ( गुजरात)

मुलाखत - महेश चेमटे

Web Title: 'Worli to Thane' .. Vayya Badminton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.