‘डीआरएस’ची चिंता व्यर्थ

By admin | Published: November 8, 2016 03:50 AM2016-11-08T03:50:41+5:302016-11-08T03:50:41+5:30

इंग्लंडविरुद्ध आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे लक्ष डीआरएसवर (पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पद्धत) राहील

The worry of 'DRS' is in vain | ‘डीआरएस’ची चिंता व्यर्थ

‘डीआरएस’ची चिंता व्यर्थ

Next

राजकोट : इंग्लंडविरुद्ध आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे लक्ष डीआरएसवर (पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पद्धत) राहील. या वादग्रस्त पद्धतीचा वापर कसा करायचा याबाबत रणनीती निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे डिआरएसची करणे व्यर्थ आहे, असे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने म्हटले आहे.
उद्या, बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या मालिकेपूर्वी पत्रकारांसोबत बोलताना रहाणे म्हणाला, ‘ही पूर्णपणे नवी पद्धत आहे. आम्हाला डीआरएससाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान आम्ही यावर चर्चा करीत होतो. त्यासाठी आम्ही काही योजना आखल्या आहेत. डीआरएसबाबत संघसहकाऱ्यांना आपली भूमिका कशी असेल याची माहिती देण्यास काही कालावधी लागणार आहे. आमचे लक्ष्य आक्रमक क्रिकेट खेळण्याचे असून, डीआरएसबाबत त्यानंतर विचार करू.’
डीआरएसला यापूर्वी बीसीसीआयने विरोध केला होता. ही पद्धत फुलप्रूफ नसल्याचे बीसीसीआयचे मत होते; पण या मालिकेत प्रायोगिक तत्त्वावर या पद्धतीचा अवलंब करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भारताला आठ वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये या पद्धतीमुळे नुकसान सोसावे लागले होते. तेव्हापासून या पद्धतीचा वापर करण्यास भारताने नकार दिला आहे.
गेल्या तीन दशकांमध्ये भारत प्रथमच मायदेशात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
रहाणे म्हणाला, ‘इंग्लंडविरुद्ध २०१४ मध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत बरेच काही शिकायला मिळाले होते. पाच सामन्यांच्या मालिकेत अखेरपर्यंत उत्साह कायम राखणे महत्त्वाचे ठरते. आम्ही इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळलेलो असल्यामुळे प्रदीर्घ कालावधीच्या मालिकेत काय करायचे असते, याची आम्हाला कल्पना आहे. युवा संघासाठी हा एक चांगला अनुभव ठरेल. पाचव्या लढतीपर्यंत उत्साह कायम राखणे महत्त्वाचे ठरते. पाच सामन्यांची मालिका खेळताना तुमच्याकडे पुनरागमन करण्याची संधी असते.’
इंग्लंडच्या फिरकीपटूंबाबत आदर व्यक्त करताना रहाणे म्हणाले, ‘इंग्लंडविरुद्ध खेळणे आव्हान ठरेल. इंग्लंड संघ तुल्यबळ असून, त्यांच्या संघात अनुभवी फलंदाजांचा समावेश आहे. कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक आणि जो रुट यांच्यासारख्या फलंदाजांना येथे खेळण्याचा अनुभव आहे. त्यांच्या फिरकीपटूंना विशेष अनुभव नाही; पण प्रतिस्पर्ध्यांबाबत आदर करायला पाहिजे. आम्ही आमच्या मजबूत बाजूवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. ही मालिका चांगली होईल, असा मला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)


‘यष्टिरक्षक डीआरएसच्या वापरासाठी अधिक महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे स्लिपमधील क्षेत्ररक्षकही महत्त्वाचा ठरतो. गोलंदाज व कर्णधाराला याबाबत माहिती देण्यासाठी यष्टिरक्षक व स्लिपमधील क्षेत्ररक्षकाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. मालिकेत आम्ही याचा कसा वापर करतो, याबाबत उत्सुकता आहे.’
‘फलंदाज म्हणून तुम्ही पूर्णपणे खेळासोबत जुळलेले असता. चेंडू कुठे जाणार होता, याची तुम्हाला कल्पना असते. त्याचप्रमाणे तुमचा सहकारी याबाबत तुम्हाला सांगू शकतो. डीआरएसचा वापर करायचा किंवा नाही याबाबत तुम्हाला स्वत:वर विश्वास असायला हवा.’
‘आम्ही चांगला खेळ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही आमची मजबूत बाजू अधिक बळकट करण्यावर भर देत आहोत. स्पेशालिस्ट स्लिप फिल्डर असल्यामुळे मी स्वत: कर्णधाराला डीआरएसच्या अचूक वापराबाबत सल्ला देऊ शकतो.’

सर्वोत्तम संघ जिंकावा : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाला शुभेच्छा दिल्या. ब्रिटनच्या पंतप्रधान टेरिजा यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी या निमित्ताने बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट संघाला शुभेच्छा देतो. उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेत सर्वोत्तम संघाने विजय मिळवावा.’

भारतात ‘डीआरएस’ वापरताना सावधगिरी बाळगावी लागेल : ब्रॉड
राजकोट : इंग्लंड संघाला डीआरएसबाबत चांगली माहिती आहे; पण भारताविरुद्धच्या मालिकेत याचा वापर करताना सावधगिरी बाळगावी लागेल, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने व्यक्त केले.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील परिस्थिती इंग्लंडसाठी भारताच्या तुलनेत वेगळी होती. ही मालिका १-१ ने बरोबरीत संपली.

आम्ही बरेचदा रेफरलचा वापर केला. चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा लागतो. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. येथे चेंडू अधिक वळतो, तर इंग्लंडमध्ये सीम व स्विंग होतो. त्यामुळे भारतात निर्णय घेताना थोडी अडचण भासण्याची शक्यता आहे. मालिकेत डीआरएसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. डीआरएसमुळे निर्णय बदलण्याची संधी असते. मी केवळ खेळण्याचा आनंद घेतो. अनेकदा तुम्हाला अचूक निर्णय मिळतात; पण त्यासाठी संघात संवाद असणे महत्त्वाचे आहे. - स्टुअर्ट ब्रॉड

कसोटी मालिकेत भारत ४-१ ने बाजी मारेल : लक्ष्मणला विश्वास
नवी दिल्ली : भारत इंग्लंडविरुद्ध उद्या, बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असून, या मालिकेत यजमान संघ ४-१ ने बाजी मारेल, असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू व सध्या समालोचक असलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने व्यक्त केला.
स्टार स्पोर्टस््वरील परिसंवादामध्ये लक्ष्मण म्हणाला, ‘माझ्या मते भारतीय संघ या मालिकेत ४-१ ने विजय मिळवेल. सर्वकाही सुरळीत घडले तर भारत ही मालिका ५-० नेही जिंकू शकतो.’
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाच्या शक्तिस्थळांबाबत चर्चा करताना लक्ष्मण म्हणाला, ‘विराट कोहलीच्या संघात फलंदाजी व गोलंदाजी यामध्ये समतोल साधला गेला आहे. संघात अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे विश्वासपात्र फलंदाज आहेत, तर फिरकीपटूंमध्ये रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. लेग स्पिनर अमित मिश्राला विसरता येणार नाही. त्यामुळे भारतीय संघात तीन जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत.’

Web Title: The worry of 'DRS' is in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.