Wrestlers Stage Protest: जर आम्ही देशासाठी लढू शकतो तर आमच्या हक्कांसाठी देखील लढू शकतो - कुस्तीपटू बजरंग पुनिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:09 PM2023-01-19T13:09:02+5:302023-01-19T13:10:12+5:30
Wrestlers Stage Protest: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर कालपासून भारतीयकुस्ती महासंघाविरोधात ऑलिम्पियन खेळाडू आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून अद्याप भारतीयकुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, "प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे." लक्षणीय बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, पैलवान बजरंग पुनिया याने सरकारला इशारा देत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याने आज एक मोठे विधान करताना म्हटले, "जर आम्ही आमच्या देशासाठी लढू शकतो तर आम्ही आमच्या हक्कांसाठी देखील लढू शकतो." अशा शब्दांत ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिल्लीच्या जंतरमंतरवरून इशारा दिला आहे. तसेच चॅम्पियन कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावली. सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आंदोलकांचे प्रश्न आज सुटावेत यासाठी मी प्रयत्न करेन, असा विश्वास बबिता फोगाट यांनी आंदोलक खेळाडूंना दिला.
Champion wrestler & BJP leader Babita Phogat arrives at the protest site at Jantar Mantar in Delhi
— ANI (@ANI) January 19, 2023
Babita Phogat has come from the government's side for mediation. We will speak with her and then give more details: Olympian wrestler Bajrang Punia pic.twitter.com/3gQUvHfBcA
If we can fight for our country, then we can also fight for our rights: Olympian wrestler Bajrang Punia at Jantar Mantar in Delhi pic.twitter.com/avwxN82zJJ
— ANI (@ANI) January 19, 2023
विनेश फोगाटचे गंभीर आरोप
विनेश फोगाटने गंभीर आरोप करताना म्हटवे, "ते (युनियन) आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि आमचा छळ करतात. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. जंतरमंतरच्या कुस्तीपटूंना हे सांगायचे आहे तेव्हापासून आम्ही आमचा आवाज उठवला आहे, पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत."
आंदोलन करावे लागते ही मजबुरी - फोगाट
"आमची मजबुरी आहे की इथे येऊन ठिय्या मांडावा लागतो. आम्ही आपापसात चर्चा केली, त्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेतला, आम्हाला दु:ख होत असताना ही योजना आखली गेली. सर्व पैलवानांना त्रास होत आहे", असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अधिक सांगितले. भारतीय कुस्ती महासंघाचे अधिकारी आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे बजरंग पुनियाने सांगितले. त्यांना कोणाच्या समस्या आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, फेडरेशन आमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करते.
ब्रिजभूषण शरण सिंगने फेटाळले आरोप
लैंगिक छळ हा मोठा आरोप आहे. माझेच नाव यात ओढले जात असताना मी कारवाई कशी करू शकतो? मी चौकशीसाठी तयार आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी म्हटले आहे. तसेच मला विनेश फोगाटला विचारायचे आहे की, तिने ऑलिम्पिकमध्ये कंपनीचा लोगो असलेला पोशाख का घातला? तिने सामना गमावल्यानंतर मी तिला फक्त प्रोत्साहन दिले आणि प्रेरित केले असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय लैंगिक छळाची कोणतीही घटना घडलेली नाही. असे काही घडले तर मी स्वत:ला फाशी देईन. अशा शब्दांत सिंह यांनी विनेश फोगाटचे आरोप फेटाळले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"