हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!

By स्वदेश घाणेकर | Published: January 17, 2023 02:35 PM2023-01-17T14:35:31+5:302023-01-17T14:37:32+5:30

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला...

wrestler of Haryana winning Olympics medals and Maharashtra wrestler are stuck in the 'Akhada' of 'Maharashtra Kesari'! | हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!

हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!

googlenewsNext

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला...  सिकंदर शेखला ( Sikandar Shaikh) जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, पण उपांत्य फेरीत तो पराभूत झाला अन् वादाला तोंड फुटले... पंचांचा निर्णय अंतिम असतो हे आपण ऐकतो, पण त्यांच्याकडूनही चुका होतात आणि म्हणून विकसित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यावरही आता विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न महाराष्ट्र केसरीतील प्रकारामुळे उपस्थित होतोय... असो हा वादाचा मुद्दा सोडला तर महाराष्ट्राचे मल्ल हे केवळ 'महाराष्ट्र केसरी' अन् 'हिंद केसरी' या दोन स्पर्धांपुरतेच मर्यादित राहिलेले दिसत आहेत... भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचे सुपूत्र होते हे आपण अभिमानाने सांगतो... पण, त्यांचा हा वारसा पुढे चालवणारा एकही मल्ल आज आपल्या मातीत जन्म घेऊ शकला नाही, ही शोकांतिका आहे.


महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या मल्लावर बक्षीसांचा वर्षाव केला जातो. त्याला सरकारी नोकरीची घोषणा केली जाते अन् तिथेच आपले मल्ल बळी पडतात. एकदा का सरकारी नोकरीचा शिक्का लागला, तर कशाला हवंय ऑलिम्पिक पदक अन् काय? बऱ्याच वर्षांपूर्वी नरसिंग यादवने ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न दाखवले होते आणि तो ते अस्तित्वात आणेल असा ठाम विश्वासही होता. पण, पठ्ठ्या डोपिंगच्या जाळ्यात अडकला अन् पुन्हा येरे माझ्या मागल्या. राहुल अवारे हा मराठमोळा मल्लही काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिकच्या शर्यतीत आहे असे वाटले होते. पण, पठ्ठ्याने ऑलिम्पिकच्या तोंडावर वजनी गट बदलले.. ( Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!) आता ते का बदलले, नेमकं काय झालं ? याचे उत्तर तोच देऊ शकतो.. 'लोकमत' ने तेव्हा त्याच्याशी याबाबत चर्चा केली होती, तेव्हा तो वजन घटवून ऑलिम्पिक गटात पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला होता... अजून त्याची वाट पाहतोय...

आता तोही पोलीस खात्यात चांगल्या पदावर कामाला लागला आहे अन् त्याच्या सोशल मीडियावर कुस्तीचे कमी अन् पोलीस वर्दीतीलच अधिक फोटो पाहायला मिळतात. आता येऊया सिकंदर शेख याच्याकडे त्याच्यावर अन्याय झाला की नाही, यात मतमतांतर असू शकतील. पण, त्याने महाराष्ट्र केसरी सोबत ऑलिम्पिकचेही स्वप्न पाहिले तर खरंच बरं होईल.. आज मुंबई व  नजिकच्या अनेक तालमी ओसाड पडलेल्या पाहायला मिळत आहेत.. .गिरण्या बंद झाल्या अन् कुस्तीची आवड असलेला एक वर्ग मुंबई बाहेर किंवा पुन्हा गावाकडे परतला.. येथे लहान लहान मुलं प्रशिक्षण घ्यायला येतात. पण, त्यांचे स्वप्न राष्ट्रीय स्पर्धांपुरते मर्यादित असते.. राष्ट्रीय स्पर्धा  जिंकायची अन् नोकरीला चिटकायचे, हेच काय ते ध्येय. मग खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे चालणार कसा. राष्ट्रकुल व आशिया स्पर्धेत अधुनमधून नावं दिसली होती, परंतु ऑलिम्पिक या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेचा आपण कधी विचार करणार?

बरं याला केवळ कुस्तीपटूंना दोष देऊन चालणार नाही... सरकारी क्रीडा धोरण सतत बदलत राहतं.. सरकार बदललं की धोरणं बदलली जातात. क्रीडा धोरणात आश्वासनांचा पाऊस पाडला की क्रीडापटू खूश ( हे केवळ कुस्तीपुरतं मर्यादित नाही)... मग काय कोणती स्पर्धा जिंकल्यावर कोणत्या दर्जाची नोकरी मिळते हे ठरवले जाते अने खेळाडू लागतात कामाला.. तिथेच ऑलिम्पिक स्वप्नांचा चुराडा होतो. कुस्तीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर महाराष्ट्रातल्या मल्लांनी ऑलिम्पिकलाही चीतपट केले आहे. त्यामुळे त्यांची स्वप्न मर्यादित आहेत आणि महाराष्ट्राची कुस्ती रसातळाला आहे...

हरयाणाचे वर्चस्व..
बजरंग पुनिया,सुशील कुमार, फोगट भगिनी, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, रवी कुमार दहिया हे सर्व हरयाणा किंवा त्या नजिकच्या प्रांतातील खेळाडू आज ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव रोशन करून झालेत आणि यातील काही अजूनही ऑलिम्पिक स्पर्धा गाजवण्याची तयारी करत आहेत. मग यात महाराष्ट्र कुठेय? महाराष्ट्र केसरी मानाची स्पर्धा आहे त्यात वाद नाहीच, पण आपल्या मल्लांनी त्यापेक्षा मोठं स्वप्न पाहायला हवं, तरच येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवता येईल. काहींच्या मते हरयाणा, उत्तर प्रदेश यांची लॉबी स्ट्राँग असल्याने तेथील मल्लांची वर्णी लागते, पण, आपणही कुठे कमी पडतोय याचा विचार व्हायला हवा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: wrestler of Haryana winning Olympics medals and Maharashtra wrestler are stuck in the 'Akhada' of 'Maharashtra Kesari'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.