रितू फोगाटची MMAच्या रिंगमध्ये 'दंगल'; भारताला जागतिक जेतेपद जिंकून देण्याचा निर्धार
By स्वदेश घाणेकर | Published: November 5, 2019 03:52 PM2019-11-05T15:52:58+5:302019-11-05T15:53:30+5:30
'दंगल गर्ल' गिता आणि बबिता फोगाट यांची बहिण रितू फोगाटनं कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत मिक्स मार्शल आर्ट्स ( MMA) मध्ये आपले नशीब आजमवणार आहे.
'दंगल गर्ल' गिता आणि बबिता फोगाट यांची बहिण रितू फोगाटनं कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत मिक्स मार्शल आर्ट्स ( MMA) मध्ये आपले नशीब आजमवणार आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या रितूच्या या निर्णयाने भारतीय कुस्ती क्षेत्राला धक्का बसणार आहे. पण, MMA च्या जागतिक जेतेपदातून ते नुकसान भरून काढण्याचा निर्धार रितूनं बोलून दाखवला आहे. सिंगापूर येथे ती MMA मध्ये पदार्पणाचा सामना खेळणार आहे.
रितूनं वयाच्या 8व्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरूवात केली. 2016च्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रितूनं 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय जागतिक ( 23 वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेत तिनं रौप्यपदकाची कमाई करून इतिहास घडवला. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय कुस्तीपटू ठरली. 2017च्याच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकले. पण, त्यानंतर ती कुस्तीपासून दूरावली. तिच्या डोक्यात काही वेगळाच विचार सुरू होता आणि तो तिनं आता प्रत्यक्षात उतरवला आहे. ''भारतात मिक्स मार्शल आर्ट्सची एवढी क्रेझ नाही. पण, मला या खेळानं आकर्षित केलं. गिता, बबिता, विनेश आणि कुटुंबीयांशी याविषयी चर्चा केली. त्यांना हा निर्णय कळवला आणि त्यांनीही आडकाठी न घातला सहमती दर्शवली,'' असे रितूने सांगितले.
कुस्ती आणि मिक्स मार्शल आर्ट्स यांच्यात बराच फरक आहे. तो ताळमेळ कसा राखला, असे विचारल्यावर रितू म्हणाली,'' भारतात असताना टीव्हीवर मिक्स मार्शल आर्ट्सचे अनेक सामने पाहिले होते. त्यामुळे आपणही त्यात कारकीर्द करावी असे वाटत होते. कुस्ती आणि मिक्स मार्शल आर्ट्सचे डावपेच यात फरक आहे. खेळ कोणताही असो सरावाला कधीच घाबरले नाही. आता मी मिक्स मार्शल आर्ट्सचा कसून सराव केला आहे.''
अपयशाला न घाबरता सतत पुढे चालत राहण्याच्या वृत्तीनं रितूला यश मिळवून दिले आहे आणि MMA मध्येही त्याचीच पुनरावृत्ती करेल, असा विश्वास तिनं व्यक्त केला. ती म्हणाली,''सतत नवीन काहीतरी शिकायला हवं. यश-अपयश हा आयुष्याचाच भाग आहे. त्यामुळे अपयशानं न खचता पुढे चालण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. भविष्यात कुस्तीकडे पुन्हा वळणार की नाही, याबाबात आताच सांगू शकत नाही. सध्या माझे लक्ष्य मिक्स मार्शल आर्ट्समध्ये भारतासाठी यश मिळवण्याचे आहे. आधी ते पूर्ण करते, नंतर पुढील लक्ष्य ठरवते. भारताला या स्पर्धेत जागतिक जेतेपद पटकावून द्यायचे, हाच निर्धार आहे.''