"कुस्ती सोडली पण काल रात्रीपासून...", ज्युनियर महिला पैलवानांसाठी साक्षी मलिकचा 'आव्वाज'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 07:56 PM2023-12-23T19:56:10+5:302023-12-23T19:56:35+5:30
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले. निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह (WFI Chief Sanjay Singh) यांच्या विजयानंतर काही कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली. कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकला आहे. तर बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला. साक्षी मलिकने कुस्तीला रामराम केल्यानंतर आता ज्युनिअर महिला पैलवानांसाठी आवाज उठवला आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यमान खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांना लक्ष्य केले.
साक्षी मलिक म्हणाली, "मी कुस्ती सोडली आहे पण काल रात्रीपासून मला काळजी वाटत आहे, त्या ज्युनियर महिला कुस्तीपटूंचे काय करावे ज्या मला फोन करून सांगत आहेत की २८ तारखेपासून ज्युनिअर नॅशनल कुस्ती स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा नवीन कुस्ती महासंघाने घेण्याचे ठरवले असून नंदनी नगर गोंडामध्ये पार पडणार आहे. गोंडा हे ब्रिजभूषणचे क्षेत्र आहे. आता कल्पना करा कोणत्या वातावरणात ज्युनिअर महिला कुस्तीपटू तिथे कुस्ती खेळायला जातील. या देशात नंदनीनगर व्यतिरिक्त कुठेही ही स्पर्धा खेळवण्यासाठी जागा नाही का? काय करावे समजत नाही."
मैंने कुश्ती छोड़ दी है पर कल रात से परेशान हूँ वे जूनियर महिला पहलवान क्या करें जो मुझे फ़ोन करके बता रही हैं कि दीदी इस 28 तारीख़ से जूनियर नेशनल होने हैं और वो नयी कुश्ती फेडरेशन ने नन्दनी नगर गोंडा में करवाने का फ़ैसला लिया है।
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) December 23, 2023
गोंडा बृजभूषण का इलाक़ा है। अब आप सोचिए कि…
पैलवानांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ब्रीजभूषण शरण सिंह यांनी शनिवारी म्हटले, "काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ते विरोध करत आहेत, त्यांच्या विरोधामुळे मी आता फाशी घेऊ का? गेले ११ महिने आणि तीन दिवस चाललेल्या ग्रहणाचा फटका कुस्तीला बसला होता. आता निवडणुका झाल्या आणि जुन्या महासंघाचा पाठिंबा असलेला उमेदवार म्हणजेच आमचे समर्थक उमेदवार संजय सिंह उर्फ बबलू विजयी झाले. विजय सुद्धा ४० ते ७ अशा फरकाने झाला. आता आमचे ध्येय कुस्तीचे काम पुढे नेण्याचे आहे."
दरम्यान, कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे मित्र कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यामुळे न्याय मिळण्याच्या आशा आणखी कमी झाल्या आहेत, असे संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता.