'गोल्डन कामगिरी'! विनेश फोगाटने 'भाव' खाल्ला; एक डील अन् कोट्यवधींचा वर्षाव, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:07 PM2024-08-21T17:07:09+5:302024-08-21T17:08:53+5:30
अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला अखेरच्या क्षणी पदकाला मुकावे लागले.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटने सुवर्ण कामगिरीच्या दिशेने पाऊल टाकले. अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला अखेरच्या क्षणी पदकाला मुकावे लागले. खरे तर फायनलआधी तिचे १०० ग्रॅम वजन वाढले अन् भारताची शिलेदार पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाली. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण किमान रौप्य मिळेल या आशेवर असलेल्या भारतीयांना इथेही मोठा धक्का बसला. विनेशला खाली हात मायदेशात परतावे लागले. मात्र, तिने केलेल्या गोल्डन कामगिरीने तमाम देशवासियांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आता विनेशच्या कमाईत देखील मोठी वाढ होणार असल्याचे दिसते.
विनेशच्या ब्रँड एंडोर्समेंट फीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता ती एका डीलसाठी ७५ लाख ते १ कोटी रुपये आकारते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी विनेशची ब्रँड व्हॅल्यू चांगलीच वाढली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विनेशला साईन करण्यासाठी जवळपास १५ ब्रँड तयार आहेत. आता तिच्या फीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वी विनेश एका ब्रँडकडून एका वर्षासाठी २५ लाख रुपये आकारत असे. मात्र आता हे शुल्क ७५ लाख ते १ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
विनेश फोगाटने 'भाव' खाल्ला
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला पदक मिळाले नाही पण तिच्या खेळीने सर्वांना आपलेसे केले. जगभरातील नामांकित पैलवान पराभवाची धूळ चारत विनेशने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे विनेशचे नाव इतके प्रसिद्ध झाले की अनेक ब्रँड्स तिला साइन करायला तयार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विनेशसह नीरज चोप्रा आणि दोन कांस्य पदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर यांनीही जाहीरातीच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोल्डन कामगिरी करण्याचे स्वप्न हुकताच विनेश फोगाटने कुस्तीला रामराम केले. या स्टार महिला कुस्तीपटूचे भारतात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आले. हरियाणाचे प्रमुख काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा विनेशच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. त्यांच्या येण्याने विनेशच्या राजकारणात प्रवेश झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.