चावा घेणारा मल्ल माझा चांगला मित्र - रवी दहिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:49 AM2021-08-14T09:49:37+5:302021-08-14T09:50:11+5:30
उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली.
- मनोज जोशी
कुस्तीसारख्या आक्रमक खेळातील खेळाडू साधारणपणे काहीसे आक्रमक स्वभावाचे असतात. ते आपल्या पराभवाचा किंवा आपल्याविरुद्ध गैरवर्तन करणाऱ्याचा वचपा काढण्यास खूप उत्सुक असतात. पण ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल रवी कुमार दहिया हा मात्र याच्या विपरीत आहे. उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली. याबाबतीत विचारले असता, रवीने केवळ इतकेच सांगितले की, ‘तो माझा चांगला मित्र आहे. तोही माझ्याप्रमाणेच पदक जिंकण्यास आला होता. खूप मोठ्या स्पर्धेत अशी घटना होत असते आणि मला याचे कोणतेही दु:ख नाही.’
रवीने २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत रौप्य जिंकले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य जिंकून त्याने ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. याशिवाय सलग दोन वेळा त्याने आशियाई अजिंक्यपदमध्ये सुवर्ण जिंकले. त्याने कोलंबिया आणि बल्गेरियाच्या मल्लांना तांत्रिक गुणांच्या आधारे नमवले. यावर त्याने म्हटले की, ‘माझी तयारी पूर्ण झालेली होती. सुरुवातीलाच गुण मिळवल्यानंतर पुढची लढत सोपी होणार याची जाणीव होती. कझाखिस्तानच्या मल्लाविरुद्ध एकवेळ मी पिछाडीवर पडलेलो, पण नंतर माझे डाव अचूक बसले आणि मी विजयी झालो.’
ज्या रशियन मल्लाविरुद्ध अंतिम फेरीत रवीचा पराभव झाला होता, त्यानेच रवीला जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही नमवले होते. याचे दडपण होते का, असे विचारले असता रवी म्हणाला, ‘नाही, तोही एक खेळाडू आहे आणि तोही जिंकण्याच्या उद्देशानेच आला होता. त्याचा सराव चांगला होता. शिवाय २०१५ साली झालेल्या दुखापतीचा माझ्या कामगिरीवर परिणामही झाला.’ पण यानंतरही रवी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावण्यापासून मुकला नाही, हे विशेष.
आता पुढील वर्षी आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याचे लक्ष्य ठेवलेल्या रवीने पीडब्ल्यूएलमधून (कुस्ती लीग) मिळालेला अनुभव महत्त्वाचा ठरल्याचेही सांगितले.
‘लीगमध्ये लढती खेळण्याच्या मिळालेल्या जास्तीत जास्त संधीमुळे स्वत:ची क्षमता पाहता आली. या लीगमुळे आम्हाला आमची तयारी तपासता आली, तसेच आमच्या कमजोरीही कळाल्या. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात कुटुंबीयांची साथ मोलाची ठरली. छत्रसाल स्टेडियममध्ये माझा भाऊ माझी तयारी पाहण्यास येत असे. त्याचे एकच स्वप्न होते की, मी देशासाठी पदक जिंकावे आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात यश आले, याचा मला खूप आनंद आहे.’
छत्रासालचे योगदान
रवीने आपल्या कारकिर्दीत छत्रसाल स्टेडियमचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ‘जेव्हा सुशीलने ऑलिम्पिक मेडल जिंकले, तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये सुशील आणि योगेश्वर यांनी पदक आणले तेव्हा ते आम्हाला खूप प्रेरीत करणारे ठरले. आम्ही येथे रोज पहाटे साडेचारला उठतो. पाच वजता क्लास झाल्यानंतर ८ ते ९ सराव व्हायचा. दुपारी थोडावेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा सराव सुरू व्हायचा आणि हा सराव ७ किंवा ८ वाजता संपायचा. प्रशिक्षकांनी नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आमची दिनचर्या ठरायची.’