भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 12:12 PM2023-12-24T12:12:11+5:302023-12-24T12:12:34+5:30
Wrestling Federation of India : ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारनेभारतीयकुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. या निर्णयामुळे नुकतीच झालेली कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून अध्यक्षपदावर विराजमान झालेले संजय सिंह आता या पदावर राहू शकणार नाहीत. कुस्ती महासंघाची निवडणूक अवैध असल्याचा दावा केंद्र सरकारने कारवाई करताना केला आहे. तसेत नवे अध्यक्ष संजय सिंह यांच्या सर्व निर्णयांनाही स्थगिती दिली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांनी विजय मिळवला होता. तर कुस्तीपटू अनिता श्योराण यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला होता. ब्रिजभूषणसारखाच दुसरा कुणीतरी कुस्ती संघाचा अध्यक्ष बनला आहे, असा आरोप तिने केला होता. तसेच संजय सिंह यांच्य निवडीविरोधात बजरंग पूनिया यानेही पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आपला पद्म पुरस्कार ठेवून एक पत्र लिहिले होते. दरम्यान, कुस्तीपटूंच्या वाढत्या दबावानंतर सरकारने नव्याने सत्तेवर आलेल्या कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे.
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघाला निलंबित करताना संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांनाही स्थगिती दिली आहे. क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत कुठलीही कारवाई करण्यालाही स्थगिती दिली आहे. जुने पदाधिकारीच सर्व निर्णय घेत आहेत, असं वाटतंय, असं डब्ल्यूएफआयबाबत दिलेल्या आदेशांमध्ये म्हटले आहे.