कुस्ती हा राष्ट्रीय खेळ व्हावा- बजरंग पुनिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:27 AM2019-01-29T06:27:27+5:302019-01-29T06:27:48+5:30
राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी मागणीवजा इच्छा व्यक्त केली.
ग्रेटर नोएडा : राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी मागणीवजा इच्छा व्यक्त केली. बजरंगने तीन आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. पद्म पुरस्कार प्राप्त हा खेळाडू म्हणाला की, कुस्ती हा असा खेळ आहे ज्यात भारताने तीन आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवले आहे. २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये कुस्तीने जगभर छाप सोडली आहे. जो खेळ देशाला पदक मिळवून देतो त्याला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात कोणतीच अडचण नसावी, असेही त्याने मत व्यक्त केले. यापूर्वी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी सुद्धा सरकारने कुस्तीला राष्ट्रीय खेळ घोषित करण्याची मागणी केली होती.
भारतात हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. मात्र, सात वर्षांपूर्वी एका आरटीआयमध्ये केंद्र सरकारने आपल्या उत्तरात म्हटले होते की देशाला आठ आॅलिम्पिकसुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या खेळाला राष्ट्रीय खेळाचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यावरून कुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
बजरंग प्रजासत्ताकदिनी पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. या पुरस्काराने तो उत्साही आहे. परंतु, आपणास राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याची खंतही आहे, असेही त्याने सांगितले. पद्म पुरस्काराचे महत्त्व काही वेगळेच आहे. मी ते चांगले जाणतो; परंतु राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने थोडा निराश झालो होतो. मात्र, योगी भाईने (योगेश्वर दत्त) मला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. एखादा खेळाडू पुरस्काराचा हक्कदार असेल तर त्याला तो नक्कीच मिळायला हवा. त्याने त्याचे मनोबल उंचावते.
खेलरत्नमध्ये निराशा पदरी आल्यानंतर मी पद्मसाठी अर्ज केला होता. खेलरत्नसाठी यासाठी अर्ज केला होता; कारण मी त्यासाठी पात्र होतो, असे वाटत होते. मी २०१४ मध्ये विश्व चॅम्पियनशीप, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकली होती. मी तेव्हाही अर्ज करू शकलो असतो; मात्र त्यावेळी मी स्वत:ला योग्य ठरवले नाही. या वेळी मात्र गुणप्रणाली पाहून मी अर्ज केलाहोता; ज्यात माझे सर्वाधिक गुण होते, असे तो म्हणाला.