कुस्ती गतीमान झाली; मात्र पहिलानांमध्ये जिद्द कमी पडतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:37 PM2018-12-24T18:37:55+5:302018-12-24T19:08:58+5:30
कुस्ती ६ मिनिटांची झाल्याने कुस्ती गतीमान झाली आहे
- जयंत कुलकर्णी
जालना : पूर्वी ९ मिनिटांची कुस्ती व्हायची. कालांतराने ही कुस्ती ६ मिनिटांची झाल्याने कुस्ती गतीमान झाली आहे, असे सांगतानाच महाराष्ट्रातील पहिलवानांत जिद्द कमी होत असल्याची खंत आॅलिम्पियन मारुती आडकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
१९७२ साली पश्चिम जर्मनीत झालेल्या म्युनिच आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मारुती आडकर हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त जालना येथे आले होते. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आता मल्लांना अद्यावत प्रशिक्षण मिळत आहे, नवीन डाव आले आहेत. एकाच सेकंदात एखादा डाव मारल्यानंतर त्यावर चार गुण मिळतात. पूर्वी ९ मिनिटे कुस्ती होती. आता ती ६ मिनिटे कुस्ती झाली आहे. त्यामुळे ती गतीमान झाली आहे. गुणांच्याही तफावतीत फरक पडला आहे. आता ढाक मारली तर एकाच वेळेस चार गुण मिळतात. त्यामुळे एखादा डाव परफेक्ट मारला तर चार गुण मिळत असल्याचे माहित असल्यामुळे पहिलवानांत जिद्द कमी झाली आहे. आताचे मल्ल आवश्यक खुराक व व्यायाम करीत नाहीत. आम्ही स्पर्धेच्या वेळी साजूक तुपाचे डबे ठेवायचे व दूधाची सोय करायचे. आताचे मल्ल दुसरे शक्तीवर्धक बाबी घेत आहेत.’’
कठोर सराव आवश्यक
महाराष्ट्रचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त दिसत नाही याविषयी त्यांना विचारले असता, ‘‘ते म्हणाले, आताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत नाही आणि त्यासाठी आवश्यक कठोर सराव करीत नाहीत. ते छोट्या यशावरच समाधानी होतात. तसे पाहता मल्लांना कुस्ती शौकीन, विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींकडूनही आता आर्थिक मदत होत आहे. खेड्यापाड्यातही मल्लांना ५0 हजार रुपये दिले जातात.’’
चित्रपटांमुळे ओढा वाढला हे चुकीचे
दंगल या चित्रपटामुळे कुस्तीची लोकप्रियता वाढली का, असे छेडले असता ते म्हणाले, ‘‘तसे काहीही नाही. दंगल चित्रपटामुळे मुलींचा कुस्ती स्पर्धेत सहभाग वाढला असे म्हणणे चुकीचे आहे. जागतिक कुस्ती संघटनेने महिला कुस्तीला मान्यता दिल्यानंतर मुलींचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राचे मल्ल मेडलही जिंकत आहे. महाराष्ट्राची अंकिता गुंड ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करीत आहे. दंगल चित्रपटामुळे मुलींचा कुस्तीकडे ओढा वाढला हे चुकीचे आहे.’’
कुस्ती महाराष्ट्रात रुजली
कुस्ती आता महाराष्ट्रात रुजत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पूर्वी कुस्तीचे माहेर म्हणून कोल्हापूर समजले जात होते; परंतु आता पुणे, अमरावती व नागपूर येथेही कुस्ती केंद्र आहेत आणि पुणे जिल्ह्यातही कुस्ती खेळ चांगलाच रुजला आहे.