डिसेंबरमध्ये रंगणार कुस्तीचा विश्वचषक
By Admin | Published: August 27, 2016 06:29 AM2016-08-27T06:29:16+5:302016-08-27T06:29:16+5:30
यजमानपदाखाली यंदा डिसेंबर महिन्यात पहिल्या खुल्या ‘विश्वविजेता गामा कुस्ती’ विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) यजमानपदाखाली यंदा डिसेंबर महिन्यात पहिल्या खुल्या ‘विश्वविजेता गामा कुस्ती’ विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विशेष म्हणजे भारतातील चार मोठ्या शहरांमध्ये या स्पर्धेचे साखळी सामने होणार असून उपांत्य व अंतिम फेरी दुबईमध्ये खेळविण्यात येईल. जगभरातील ५० देशांच्या मल्लांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची घोषणा शुक्रवारी मुंबईत करण्यात आली.
कुस्तीची जागतिक संघटना युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) मान्यता दिलेल्या या स्पर्धेत ८५ ते १२५ किलो वजनीगटातील जगभरातील आॅलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद विजेते खेळाडू विश्वविजेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेबाबत माहिती देताना डब्ल्यूएफआयचे सचिव टी. एन. प्रसूद यांनी सांगितले की, ‘‘स्पर्धेतील विजेत्या मल्लाला एक कोटी रुपये, सोन्याचा मुकुट आणि एक किलो वजनाची गदा जिंकण्याची संधी असेल, तर उपविजेत्या मल्लाला ५० लाख रोख रुपयांसह ५ किलोवजनी चांदीची ढाल जिंकण्याची संधी आहे. तसेच, उपांत्य फेरीतील पराभूत दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.’’
शिवाय, रिओ आॅलिम्पिकदरम्यान गाजलेल्या डोपिंग प्रकरणानंतर या स्पर्धेतही डोपिंग चाचणी करण्यात येणार
असून याकडे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेचे (नाडा) बारीक लक्ष
असेल, असेही प्रसूद यांनी स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)
स्पर्धेचे स्वरूप :
भारतातील चार शहरांमध्ये बाद पध्दतीने पाच गटात लढती होतील.
प्रत्येक गटातील अव्वल २ असे एकूण
१० मल्ल साखळी पध्दतीने
एकमेकांविरुद्ध लढतील.
वर्गीकरण गुणांच्या आधारे अव्वल ४ मल्लांची दुबईसाठी बाद फेरीकरिता निवड.
भारतीय मल्लांसाठी स्वतंत्र गट.
‘हिंद-ए-महाबली’ स्पर्धेतून अव्वल
२ भारतीयांची निवड.
पात्रता फेरी दिल्ली व मुंबईला रंगणार,
तर राउंड रॉबिन लढती पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद येथे होतील.
>भारतात पहिल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यावेळी डावीकडून भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव टी. एन. प्रसूद, वस्त्रोद्योगमंत्री अर्जुन खोतकर, अनिरुद्ध धूत, संदीप भोंडवे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे उपस्थित होेते.
>नरसिंग, बृजभूषण अनुपस्थित
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृहभूषण सराह सिंग आणि डोपिंगमुळे रिओ आॅलिम्पिकला मुकलेला मल्ल नरसिंग यादव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. मात्र, दोघेही अनुपस्थित होते.
>ही स्पर्धा महाराष्ट्राच्या मल्लांसाठी मोठी संधी आहे. भारतीय मल्लांच्या गटातून सहभागी होऊन त्यांनी जागतिक स्तरावर छाप पाडण्याचा प्रयत्न करावा.
- बाळासाहेब लांडगे,
महाराष्ट्र कुस्ती संघटना, सचिव