धोनीला कर्णधारपदावरून हटविणे चुकीचे : कर्स्टन

By admin | Published: November 2, 2016 07:01 AM2016-11-02T07:01:57+5:302016-11-02T07:01:57+5:30

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीला कर्णधारपदावरून हटविणे सर्वात मोठी चूक ठरेल

Wrong to delete Dhoni from captaincy: Kirsten | धोनीला कर्णधारपदावरून हटविणे चुकीचे : कर्स्टन

धोनीला कर्णधारपदावरून हटविणे चुकीचे : कर्स्टन

Next


मुंबई : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीला कर्णधारपदावरून हटविणे सर्वात मोठी चूक ठरेल, असे मत माजी विश्वविजेते प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले.
वन-डे संघाचे कर्णधारपद विराटकडे सोपविण्याची वेळ आली आहे का, या प्रश्नाचे कर्स्टन यांनी नकारात्मक उत्तर दिले. कर्स्टन म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या जोखिमेवर धोनीला बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. पण मी अनुभवावरून सांगू शकतो, की सर्व महान कर्णधारांनी चमकदार कामगिरीने कारकिर्दीचा शेवट केला आहे. जर कुणी धोनीला हटविण्यास इच्छुक असेल, तर भारताला ब्रिटनमध्ये २०१९च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान सामने जिंकून देणाऱ्या चमकदार कामगिरीला मुकावे लागू शकते.’’
धोनी महान खेळाडू असल्याचे सांगताना कर्स्टन यांनी टीकाकारांना फटकारले आणि धोनीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे चूक असल्याचे म्हटले.
धोनीच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना कर्स्टन म्हणाले, ‘‘मी ज्या वेळी भारतात येतो त्या वेळी हा प्रश्न मला विचारण्यात येतो. तीन वर्षांत माझे उत्तर बदलले नाही. मी ज्या कर्णधारांसोबत काम केले त्यात धोनी निश्चितच सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटसोबत त्याच्या ९-१० वर्षांच्या कारकिर्दीतील आकडेवारी सर्व काही सांगून जाते.’’(वृत्तसंस्था)
कर्स्टन म्हणाले, ‘‘माझ्या मते भारताच्या महान कर्णधारांमध्ये धोनीचा समावेश आहे. त्याने कर्णधार म्हणून भारताला प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावून दिले आहे.’’ भारताने २०११मध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते त्या वेळी धोनी कर्णधार तर कर्स्टन प्रशिक्षक होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीची कामगिरी सर्वकाही स्पष्ट करणारी असल्याचे सांगत कर्स्टन म्हणाले, ‘‘तुम्ही वन-डे क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीची आकडेवारी बघायला हवी. फिनिशर म्हणून तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो ते बघता त्याच्या कामगिरीकडे डोळेझाक करता येणार नाही. हे बघितल्यानंतरही जर कुणी त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत असेल तर ती मोठी चूक ठरेल.’’

Web Title: Wrong to delete Dhoni from captaincy: Kirsten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.